Shocking! नापिकीमुळे जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल!
बुलडाणा तालुक्यातील महावितरणचा बळी...
आधी नापिकीमुळे बँकेच्या कर्जाचा वाढलेला डोंगर, सोयाबीनला न मिळालेला भाव आणि आता हरबरा पेरला तर रोहित्र बंद असल्याने पाणी देता येत नसल्याने झालेले नुकसान यामुळे नैराश्य येऊन ६३ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात आज, ७ डिसेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास समोर आली. रमेश बाबुराव रिंढे (रा. तांदुळवाडी) असे आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. सकाळी त्यांचा पुतण्या सागर बळीराम रिंढे शेतात विद्युतपंप चालू करण्यासाठी गेला असता स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला रमेश रिंढे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलीस पाटलांनी घटनास्थळी येऊन बुलडाणा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. पुतण्या सागर व पोलीस पाटील राजेश रिंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश रिंढे यांच्याकडे बँकेचे कर्ज थकीत होते. नापिकी आणि हाती आलेल्या उरल्यासुरल्या सोयाबीनलाही भाव मिळत नसल्याने ते नैराश्यात होते, अशी माहिती समोर आली. रब्बी हंगामात हरभरा पिक पेरले. पण विद्युत रोहित्र बंद असल्याने पिकाला पाणी देता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
मोताळा तालुक्यातील शेतकरी अल्प उत्पन्न अन् वाढत्या कर्जामुळे होता तणावात...
मोताळा तालुक्यातही नापिकीचा आणखी एक शेतकरी बळी पडल्याचे समोर आले. कर्जबाजारीपणाला कंटाळून सिंदखेड लपाली येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, ६ नोव्हेंबरला सकाळी समोर आली. संजय रामकृष्ण गडाख (४९, रा. सिंदखेड लपाली, ता. मोताळा) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीत नापिकीमुळे अल्प उत्पन्न व कर्जामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले. सिंदखेड लपाली शिवारातील स्वत:च्या शेतात त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना अत्यावस्थेत बुलडाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.