हरभरा पचला नाही... खामगाव पोलिसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या !!, एमआयडीसीत झाली होती चोरी
विठ्ठल पंजाबराव मेहंगे (२६, रा. आनंदसागर रोड शेगाव) व विशाल गजानन भटकर (२५, रा. रोकडियानगर, शेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील महाराष्ट्र वखार महामंडळाचे गोदाम १ डिसेंबरच्या रात्री फोडले होते. २ डिसेंबर रोजी गोडाऊनचे व्यवस्थापक मनोज छगनलाल व्यास यांनी तक्रार देत ४ लाख ९० हजार ८७५ रुपयांचा हरभरा लंपास झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांनी तपासासाठी पोलिसांचे पथक गठीत केले होते.
पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज, गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे शेगावातून विठ्ठल आणि विशालला अटक केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेला हरभरा त्यांनी खामगावातील खासगी जय किसान कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विकल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपींकडून चोरलेला ८७ क्विंटल हरभरा, गुन्ह्यात वापरलेले ४०७ वाहन, आरोपींचे मोबाइल असा एकूण ११ लाख ५४ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बळीराम वरखेडे, नापोकाँ दिनेश इंगळे, संतोष वाघ, पोकाँ दीपक राठोड, प्रफुल्ल टेकाळे, जितेश हिवाळे, अमरदिपसिंह ठाकूर, अनंता डुकरे, महिला पोहेकाँ प्रीती निर्मळ व सायबर पोलीस ठाणे बुलडाणा यांनी पार पाडली.