Positive Story : एसटी संप, कर्मचाऱ्यांची वाताहत... त्‍यातही शिक्षणाची ओढ!; अभ्यासात सात वर्षांचा खंड पडूनही मेहकरच्या बस कंडक्टरने केली सेट परीक्षा उत्तीर्ण!!

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भूक माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मग ती पोटाची भूक असो अथवा काही मिळविण्याची... शिक्षणाच्या बाबतीतही तसेच! ज्ञान मिळविण्याची उत्कट इच्छा असेल तर माणूस परिस्थितीवर मात करून शिकतोच आणि त्‍याच्या अथक प्रयत्नांना यशही मिळतेच. मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रूक येथील एसटी वाहकाने ही बाब सत्‍य करून दाखवली आहे. एसटीच्या धकाधकीच्या नोकरीमुळे अभ्यासात तब्बल ७ वर्षांचा खंड पडल्यानंतरही त्‍यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याची किमया केली. गणेश काशिराम राठोड असे या ध्येयवेड्या वाहकाचे नाव असून, सध्या ते वाशिम जिल्ह्यातील रिसोड आगारात कार्यरत आहेत. विलिनीकरणाच्या लढ्यात तेही सहभागी आहेत.

श्री. राठोड यांनी दहा वर्षांपूर्वी १२ वीनंतर डीटीएड केले. त्‍यानंतर एसटी महामंडळात वाहक म्हणून नोकरीला लागले. नोकरीच्या व्यस्ततेमुळे त्यांना शिक्षण थांबवावे लागले. मात्र शिक्षणाची भूक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. जवळपास सात वर्षांचा खंड पडल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी बी. ए. पदवी मिळवली. त्यानंतर अकोल्यातील महाविद्यालयातून मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स ॲन्‍ड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण ९२.५० टक्के एव्हढे विक्रमी गुण मिळवत पूर्ण केले. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणून २६ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांनी सेट परीक्षा दिली आणि पहिल्याच परीक्षेत त्यांनी परीक्षा उत्तीर्णही करून दाखवली. इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती कशीही असली तरी यश तुमच्यापासून कुणाला हिसकावून घेता येत नाही, हेच श्री. राठोड यांनी सिद्ध करून दाखवले.

१२ तास नोकरी करून असा केला अभ्यास
वाहक म्हणून नोकरी करताना तुटपुंजा पगार. रिसोड शहरात खोली करून राहताना खोलीभाडे ४ हजार लाईटबिल असे जाऊन हातात ९ ते १० हजार रुपयेच मिळत होते, असे श्री. राठोड यांनी सांगितले. सेट परीक्षेचा अभ्यास करत असताना महागडी पुस्तके खरेदी करायला पैसे पुरत नव्हते. त्यामुळे मोजकी पुस्तके आणि जास्तीत जास्त युट्यूब व्हिडिओ पाहून अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले.

एसटी गाडी सुटली. सर्वांचे तिकीट काढले की पुढचा स्टॉप येईपर्यंत मी युट्यूब व्हिडिओवरून अभ्यास करत होतो. १२ तासांची ड्युटी आटोपल्यानंतर घरी येऊन ५ तास अभ्यास केल्याचे ते सांगतात. आता पीएच.डी. करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे पुण्यातील नामांकित संस्थेत मोठ्या पगाराची ऑफर आली असल्याने आता एसटी नोकरी करावी लागणार नाही. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या लढ्याला यश मिळालेच पाहिजे, असे ते कळकळीने सांगतात.