पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना "गुड-न्युज"! केंद्र सरकार आणि राज्य सरकार खात्यात जमा करणार एवढे पैसे..! त्यासाठी "हे" करावे लागणार..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या मे महिन्याचा तिसरा आठवडा सुरू आहे. वेगवेगळ्या हवामान तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार पेरणीचे दिवस आता जवळ आले आहेत. साधारणतः जूनच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पेरणी सुरू होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बियाणांचा साठा जिल्ह्यात मुबलक असल्याचे याआधीच पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केले होते. १ लाख ६० हजार रुपयापर्यंत पीककर्ज घेण्यासाठी सिबील ची अट लागणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. दरम्यान आता केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी काही देता येईल का,याचा विचार सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्वच शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लागू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १२ महिन्यांत ३ टप्प्यात प्रत्येकी २ - २ हजार रुपये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाही. केंद्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे १३ हप्ते शेतकऱ्यांना वितरीत केले आहे. याचाच अर्थ पहिल्या हप्त्यापासून या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने आतापर्यंत २६ हजार रुपये दिले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने जे केलं तेच आता राज्यातील शिंदे फडणवीस सरकार करणार आहे. केंद्राप्रमाणे राज्यानेही शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये ३ टप्प्यात द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्राचे ६ आणि राज्याचे ६ असे प्रत्येक शेतकऱ्याला १२ हजार रुपये मिळणार आहेत.
  
  केंद्राच्या योजनेचा १४ वा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार सुद्धा त्यांच्या योजनेचा पहिला हप्ता पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या विचारात आहे. दरम्यान पात्र शेतकऱ्यांनी आपले केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते अद्याप आधार कार्डशी जोडलेले नाही त्यांनी तातडीने आधार जोडणे आवश्यक आहे.