जळगाव जामोदच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या; आमदार संजय कुटेंची विधानसभेत मागणी; सरकारला म्हणाले, घोटाळ्यांचं काय झालं जनतेला कळू द्या!
कोरोना काळात कुणी रुग्णाला हात लावायला तयार नसताना कंत्राटी कर्मचारी, आशा सेविकांनी काम केले. मात्र चार चार महिने त्यांचे पगार झाले नाहीत. आता शासनाने त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून वाऱ्यावर सोडले. आरोग्य भरतीच्या पदभरतीचा घोटाळा झाला. त्याचे पुढे काय झाले हे समोर येऊ द्या, असे आमदार कुटे म्हणाले. राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दीड ते दोन हजार जागा रिक्त आहेत.
१० ते २० हजार जागा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. कसा आरोग्य खात्याचा कारभार नीट चालेल? असा प्रश्नही त्यांनी सभागृहात केला. जळगाव जामोदमध्ये अधीक्षकच नाही, वरवट बकाल येथे डॉक्टर नाहीत. त्यामुळे तातडीने रिक्त जागा भरल्या पाहिजेत. जळगाव जामोदच्या ग्रामीण रुग्णालयात अनेक आदिवासी बांधव उपचारासाठी येतात. रुग्णालयाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी डॉ. संजय कुटे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.