बुलडाण्यात उद्या, परवा सरकारी कर्मचाऱ्यांचा संप!
चर्चा व वाटाघाटीचा प्रश्न न उरल्याने दोन दिवसीय संप अटळ असल्याचे "मध्यवर्ती'च्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. शासकीय व निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी होत असल्याने यामुळे बहुतेक शासकीय, निमशासकीय कार्यालय व विभागांचे कामकाज प्रभावित होणार आहे. यामुळे संभाव्य बाबी लक्षात घेऊन शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने संपकरी कर्मचाऱ्यांविरुद्ध गैरवर्तणूक व शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
आरोग्य कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच २३ व २४ फेब्रुवारीला कार्यालये वेळेवर उघडणे व बंद करण्याची जबाबदारी जबाबदार अधिकाऱ्यांवर सोपवावी. प्रसंगी पोलीस व होमगार्डची मदत घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहे. सर्व अधिकारी व विभाग प्रमुखांनी दोन्ही दिवस कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे.
या आहेत मागण्या...
नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे. केंद्रीय एनपीएस कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सुविधा राज्यात लागू करा, केंद्राप्रमाणे पेन्शनमध्ये वाढ करा, अंगणवाडी- आशा- महिला परिचर यांच्या सेवा नियमित करा, आरोग्यसह सर्व विभागातील रिक्त पदे भरावी, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते द्यावे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिनशर्त कराव्या, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न मार्गी लावावे, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, पेट्रोलियम पदार्थांवरील केंद्रीय कर कमी करावा आदी १४ मागण्यांसाठी हा लाक्षणिक संप करण्यात येत आहे.