Buldana Live Exclusive : जिल्ह्याच्या सुपूत्राची लोणार ते लंडन भरारी! फोर्ब्स इंडियाच्या यादीत झळकला!!
फोर्ब्स या नामांकित पत्रिकेच्या वेगवेगळ्या याद्यांची अनेकांना प्रतीक्षा असते. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राजू केंद्रेवर एक स्टोरी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील हा धडपड्या तरुण सध्या युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये "डेव्हलपमेंट स्टडीज'चे शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणातील टक्का वाढावा, समाज परिवर्तनासाठी तरुण कार्यकर्ते उभे राहावेत यासाठी एकलव्य अकादमी राजूने सुरू केली आहे. आर्थिक दुर्बलता तसेच पालकांचे अज्ञान ओळखून एकलव्य अकादमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्यभर मोठे काम करत आहे. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा प्रवेश मिळावा, यासाठी एकलव्यची टीम मदत करत आहे. केवळ २५ वर्षांचा हा तरुण परिस्थितीचे रडगाणे गात बसत नाही.
वर्षभरापूर्वी केरळमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी ८५ तरुणांची फळी घेऊन तो केरळमध्ये मदतकार्यासाठी पोहोचला होता. लंडनला जाण्यापूर्वी राजूने यवतमाळ येथील सावित्री ज्योती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राजूने मुख्यमंत्री फेलोशीपच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील पारधीबेडा येथे उल्लेखनीय काम केले. जन्मजात गुन्हेगार आणि चोर समजल्या जाणाऱ्या पारधी समाजाच्या वस्तीकडे कधी प्रशासन पोहोचलेच नाही. तेथील भकास चित्र पाहून राजू अस्वस्थ व्हायचा. पारधी वाड्यातच राजूने अनेक दिवस मुक्काम ठोकला. साधीभोळी आणि प्रेमळ असणाऱ्या माणसांना लोक अन् पोलीसही चोर का समजतात, या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी राजूने पुढचे पाऊल टाकले. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शासकीय योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवणे आणि माहिती देणे हा उपक्रम राजूने पारधी वाड्यावर सुरू केला. ३१ डिसेंबरच्या रात्री थर्टी फर्स्ट ही दारू पिऊन नव्हे तर दूध पिऊन पारधीबेड्यावर राजूने सुरू केली. यवतमाळ येथे पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात सुद्धा राजूचा सक्रिय सहभाग होता.
ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवली होती...
देशातील नामांकित तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये ग्रामीण विकास या विषयात पदव्युतर शिक्षण घेतल्यानंतर राजूने स्वतःच्या गावासाठी विकासाचे धोरण आखायचे ठरवले. २०१५ मध्ये त्याने गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पुढाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. युवकांचे आदर्श पॅनल उभे केले. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विकासाचा जाहीरनामा लिहून गावकऱ्यांसमोर मांडला. "आम्ही समाजकारणातून गावाचा कायापालट करू' या उद्देशाने स्टॅम्पपेपरवर जाहीरनामा लिहून देणारी पिंप्री खंदारेची निवडणूक राज्यातील पहिली ग्रामपंचायतीची निवडणूक ठरली. राजूच्या राज्यभर पसरलेल्या मित्रांनी या तरुणांना निवडणुकीसाठी मदत केली. मात्र राजू आणि त्याच्या सहकाऱ्यांचे पॅनल राजकारणाच्या खेळाचा बळी ठरले. निवडणूक हरले तरी मात्र राजीव खचला नाही. राजूने त्याचे काम अविरत सुरूच ठेवले. त्याच्या याच कामाची दखल घेत फोर्ब्सने त्याचा गौरव केला आहे. यामुळे राजूवर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.