भररस्त्यातून १५ वर्षीय मुलीला उचलून नेले!

खामगाव शहरातील घटना
 

मावशीसोबत दवाखान्यातून घराकडे परतत असलेल्या १५ वर्षीय मुलीचे मावशीच्यादेखत भररस्त्यातून अपहरण करण्यात आले.

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मावशीसोबत दवाखान्यातून घराकडे परतत असलेल्या १५ वर्षीय मुलीचे मावशीच्यादेखत भररस्त्यातून अपहरण करण्यात आले. ही धक्कादायक घटना १९ ऑक्टोबरच्या रात्री सव्वाआठच्या सुमारास खामगाव शहरातील चिंतामणी मंदिराजवळ घडली. मुलगी खामगावातील महाकाल चौक भागातील रहिवासी आहे. मुलीच्या आईने खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार राहुल राजेश अंभोरे (१९, रा. महाकाल चौक, खामगाव) या तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ वर्षीय कल्याणी (नाव बदलले आहे) तिच्या मावशीच्या मुलाची तब्येत ठीक नसल्याने मावशीसोबत घाटपुरी नाक्यावरील हेरम हॉस्पिटलला गेली होती. दवाखाना आटोपून घराकडे परतत असताना चिंतामणी मंदिराजवळ रात्री सव्वा आठच्या सुमारास राहुल दुचाकीवरून तेथे आला व कल्याणीला फूस लावून घेऊन गेला. तिच्या मावशीने आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत राहुल कल्याणीला घेऊन पसार झाला. नातेवाइकांच्या मदतीने कल्याणीचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून राहुल विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.