ऑफिस टायमिंग व्यतिरिक्‍त कर्मचाऱ्याला कॉल केला तर बॉस थेट तुरुंगात!

 
File Photo
लिस्बन : पोतुगाल देशात आता कार्यालयीन वेळेव्यतिरिक्‍त कर्मचाऱ्याला कॉल केला तर बॉस अडचणीत येणार आहे. त्‍याला थेट शिक्षा होण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. तसा आदेश पोर्तुगाल सरकारने काढला आहे.

कामगार आणि सामाजिक सुरक्षा मंत्री एना मेंडिस गोडिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना लिस्बनमध्ये ही माहिती दिली. कोरोनामुळे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक बॉस वेठीस धरत असल्याच्या तक्रारी कामगार मंत्रालयाकडे आल्या होत्या. कामाचे तास संपल्यानंतरही अनेक बॉस कॉल, मेसेज करून कर्मचाऱ्याला काम करायला भाग पाडत होते. यामुळे कर्मचाऱ्यांत मानसिक तणाव वाढत असल्याचे समोर आले होते.

कंपन्यांनी कामगारांना नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मंत्री एना गोडिन्हो म्‍हणाल्या. ज्‍या कंपन्यात १० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, तिथे सरकारचा हा आदेश लागू हाेणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा आदेश देण्यात आला असून, मूल ८ वर्षांचे होईपर्यंत कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होमच द्यावे लागणार आहे. अर्थात त्‍यासाठी कर्मचाऱ्याने मागणी करायला लागणार आहे.