कुणी म्हणे कुटे,कुणी म्हणे महाले, कुणी म्हणे संचेती...पण फडणवीसांच्या मनात होते ॲड.आकाश फुंडकर! आज संध्याकाळी घेणार मंत्री पदाची शपथ...! खामगावात जल्लोष...
Dec 15, 2024, 13:24 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आज,१५ डिसेंबरला मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातून महायुतीचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते यावर तर्क वितर्क सुरू होते.. जो तो आपापली बाजू लावून धरत होता.. संजय कुटे आणि चैनसुख संचेती यांचे नाव मंत्री पदाच्या शर्यतीत समोर होते. महिला मंत्री या नात्याने श्वेताताई महाले यांना देखील संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांची जोरदार आग्रही मागणी होती... या तिघांच्या तुलनेत ॲड.आकाश फुंडकर यांचे नाव मात्र फारसे समोर नव्हते.. मात्र भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरले आणि खामगाव मधून तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणणाऱ्या ॲड. आकाश फुंडकर यांच्या नावावर मंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले आहे..आज सायंकाळी नागपुरात आकाश फुंडकर मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकाश फुंडकर यांना फोन करून मंत्री म्हणून शपथ घेण्याच्या सूचना दिल्या.
आकाश फुंडकर यांचे वडील स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून भाजप महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचवली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांनी कारकीर्द गाजवली. २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांची वर्णी लागली होती. मात्र भाऊसाहेब अकाली गेले. आता फुंडकर कुटुंबातून आकाश फुंडकर मंत्री पदाची शपथ घेत आहेत.. ही वार्ता पसरताच खामगाव मध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे...