पोलीस आमदार संजय गायकवाडांची गाडी धुतात ..! माजी आमदार हर्षवर्धन सपकाळांनी व्हिडिओच पोस्ट केला! म्हणाले, महाराष्ट्र पोलीस शर्म करो;
Aug 29, 2024, 11:11 IST
तुम्ही आया बहिणींची सुरक्षा करण्यासाठी की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी...
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड सातत्याने चर्चेत असतात..सातत्याने त्यांच्या विधानांवरून वादंग निर्माण होते..आता आमदार गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत,पण ते वेगळ्या कारणाने.. आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धूत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंट वरून तो व्हिडिओ पोस्ट केला असून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल केला आहे..
बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यासह शिंदेच्या ४० आमदारांना व खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ती सुरक्षा अद्यापही कायम आहे. दरम्यान आ.गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचे वाहन धुत असल्याचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केला आहे. हा पोलीस कर्मचारी नेमका कोण हे व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही मात्र आमदार गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकीच तो एक असावा असा अंदाज आहे. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद असलेली महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आया बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी ? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या या वर्तनावर एसपी सुनील कडासने काय कारवाई करणार? करणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.