चिखलीत आज रात्री रंगणार थरार! विदर्भ मराठवाड्यातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज; कोण होणार आमदार चषकाचा मानकरी?
आमदार श्वेता ताईंच्या वाढदिवसानिमित्त डोळे दिपवणारे आयोजन..!
Mar 26, 2023, 16:53 IST
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एखाद्या क्रीडा स्पर्धेच आयोजन कस असावं तर ते सध्या चिखलीत पार पडलेल्या डे- नाईट आमदार चषकासारखं...! हो, क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा उत्तम आदर्शच आमदार श्वेताताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवराजदादा पाटील मित्र मंडळाने घालून दिलाय. डोळे दिपवणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम थरार आज,२६ मार्चच्या संध्याकाळी रंगणार आहे. रात्री उशिरापर्यंत सामना रंगणार असल्याने आमदार श्वेताताईंच्या वाढदिवशीच २७ जानेवारीच्या तारखेत या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ चिखलीच्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात पार पडेल.
२२ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले मोठे खेळाडू १६ संघाच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेच्या निमित्ताने चिखलीकरांना पहिल्यांदाच डे - नाईट क्रिकेटचा थरार अनुभवता आला. १६ संघापैकी ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. शिवराणा चांडोळ,निलेश गावंडे, युनिक आणि साईबाबा ११ या संघापैकी विजेता व उपविजेता संघ आज ठरणार आहे. हा थरार पाहण्यासाठी चिखलीच्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर प्रचंड गर्दी उसळणार आहे.