स्वामी दळवी, मोनाली जाधव, विजय पळसकर, मिहीर अपार यांना क्रीडा पुरस्कार जाहीर; प्रजासत्ताक दिनी बुलडाण्यात वितरण

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्रीडा क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, संघटक, कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन त्‍यांचा सन्मान करण्यात येईल. यंदा स्वामी सुधाकर दळवी (गुणवंत खेळाडू),  कु. मोनाली चंद्रहर्ष जाधव (गुणवंत खेळाडू), विजय भाऊराव पळसकर (गुणवंत क्रीडा मार्गदर्शक), मिहीर नितीन अपार (विशेष जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार) यांची निवड झाली आहे.

पुरस्काराचे स्वरुप दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असून, 26 जानेवारी 2022 या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे वेळी पोलीस कवायत मैदान, बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

कोण आहेत पुरस्कारार्थी...

  • स्वामी दळवीने मागील पाच वर्षांत सन 2016-17 व 2018-19 या वर्षीच्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक तर सन 2018-19 मध्ये दोन रजत पदक प्राप्त केले आहे.
  • मोनाली जाधवने मागील पाच वर्षांत रांची (झारखंड) या ठिकाणी झालेल्या 7 वी ऑल इंडीया आर्चरी चॅम्पीयनशीपमध्ये सुवर्ण पदक तर कट्टक (ओडीसा) या ठिकाणी झालेल्या 39 वी ऑल इंडिया सिनीयर नॅशनल आर्चरी चॅम्पीयनशीप मध्ये रजत पदक प्राप्त केले.
  • विजय भाऊराव पळसकर यांनी मागील 10 वर्षांत आट्यापाट्या या खेळात जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करून पदक विजेते खेळाडू घडविलेले आहेत. ते सध्या मलकापूर तालुका क्रीडा संकुलात आपल्या खेळाचा नियमित प्रचार व प्रसार करीत आहे.
  • मिहीर नितीन अपारने पोलंड येथे झालेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघाकडून सहभाग घेऊन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.