तुमचा माझा जन्म ज्या मासिक पाळीमुळे ती अपवित्र कशी?

"क्षितिज'च्या स्‍नेहल चौधरी-कदम Buldana Live कार्यालयात!; समाजातील त्‍या रूढी-परंपरांवर ओढले ताशेरे!
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुमचा माझा जन्मच ज्या मासिक पाळीच्या चक्रामुळे झालाय ती मासिक पाळी अपवित्र कशी होऊ शकते? मासिक पाळी असलेल्या महिलेने लोणच्याला स्पर्श करू नये, पापडाला स्पर्श करू नये, देवपूजा करू नये या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. ती मानवजातीसाठी शाप नाही तर वरदानच आहे, असे परखड आणि स्पष्ट मत क्षितिज फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्‍नेहल चौधरी- कदम यांनी व्यक्त केले. "बुलडाणा लाइव्ह'च्या थेट-भेट कार्यक्रमात जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांनी ३० नोव्‍हेंबरला दुपारी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी महिलांच्या मासिक पाळीविषयक समाजात असलेल्या रूढी, अंधश्रद्धा यावर त्‍यांनी ताशेरे ओढले.

सॉफ्‍टवेअर इंजिनिअर असलेल्या सौ. स्‍नेहलताई शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थिनी, आदिवासी भागातील महिला- मुलींत मासिक पाळीविषयी जागृती करतात. आजवर ६० हजार मुलींना त्‍यांनी मार्गदर्शन केले. जनजागृतीच्या या कार्याला अधिक व्यापक करण्यासाठी त्‍यांनी क्षितिज फाऊंडेशन ही संस्‍थाही स्‍थापन केली आहे. या संस्‍थेच्या माध्यमातून राज्‍यभर आता हे काम चालत आहे. विशेष म्‍हणजे, बुलडाण्याचे नवनियुक्‍त उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या त्‍या अर्धांगिनी आहेत. २०१७ मध्ये त्यांचा विवाह झाला. मात्र त्यापूर्वीच सौ. स्‍नेहलताईंनी वेगळी ओळख निर्माण केली होती. वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे अतिशय धार्मिक कुटूंबात वाढलेल्या स्‍नेहलताईंची सोलापूर जिल्ह्यातील सचिन कदम यांच्याशी महिला पोलिसांसाठी असलेल्या मासिक पाळीविषयक कार्यक्रमातच ओळख झाली होती. सॉफ्‍टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या ताईंना कुठल्याही कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करणे शक्‍य होते. पण ती त्‍यांची प्राथमिकता कधीच नव्हती. समाजात राहून समाजासाठी काहीतरी चांगले करत राहायचे, हेच त्‍यांचे ध्येय होते. मासिक पाळीविषयक समाजात खूप जागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच मी या क्षेत्रात आले, असे त्‍या म्‍हणाल्या.

शिक्षण हे केवळ चांगला जोडीदार मिळावा एवढ्यासाठीच होते. मात्र माझे काम करण्याचे क्षेत्र आधीच ठरले होते, असेही त्‍यांनी सांगितले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्‍नेहलताई अनाथ आश्रमात जात होत्या. तिथल्या लहान मुलीशी त्यांची चांगली मैत्री झाली होती. अनाथ आश्रमातील एक ८ व्या वर्गात शिकणारी एक मुलगी दुपारीच शाळेतून पळून आली व तिने स्वतःला कोंडून घेतले होते. ही माहिती कळताच बारावीत शिकणाऱ्या स्‍नेहलताई अनाथ आश्रमात गेल्या. पळून आलेल्या मुलीशी संवाद साधला असता तिने ब्लड कॅन्सर झालाय, असे भीतीने सांगितले. मात्र ती तिची पहिली मासिक पाळी आहे, हे तिला माहीत नव्हते. या प्रसंगामुळेच मासिक पाळीविषयक जनजागृतीची खूप आवश्यकता आहे असे वाटले आणि आपण कामाला सुरुवात केली, असे स्‍नेहलताईंनी सांगितले. गरोदरपणात असतानाही त्यांनी काम थांबविले नाही. चिमुकली सावी (तिचे नामकरण सुद्धा झाले नव्हते) सात दिवसांची असतानासुद्धा स्‍नेहलताई महाराष्ट्रातील तरुणींशी संवाद साधत होत्या. आई- वडील, पती सचिन कदम आणि क्षितिज फाऊंडेशनची सर्व निस्वार्थी सेवा देणारी टीम यामुळेच हे कार्य करता येत आहे. मासिक पाळीविषयक जनजागृती करण्याची आवश्यकताच संपावी हे क्षितिज फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर महिलाविषयक अनेक मुद्यांवर काम करायचे आहे, असे स्‍नेहलताई बुलडाणा लाइव्हशी बोलताना म्हणाल्या. स्‍नेहलताईंची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी पहा व्हिडिओ ः