जिजाऊंचे दर्शन घेऊन विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार! रविकांत तुपकरांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी रणरणत्या उन्हात जनसागर उसळला;

"शेतकऱ्यांचा कणखर बाणा... निवडून आणा पाना" च्या जयघोषाने दुमदुमले सिंदखेड राजा! रविकांत तुपकर म्हणाले,मी जनतेचा उमेदवार कायम जनतेचाच राहणार...
 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मी कोणत्या पक्षाचा, कोणत्या नेत्याचा उमेदवार नाही. मी शेतकरी, कष्टकरी, मजूर, तरूण, सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि शेवटपर्यंत सर्वसामान्य जनतेचाच राहणार आहे. माझा विजय हा सर्वसामान्यांचा विजय ठरणार आहे अशी ग्वाही देत रविकांत तुपकर यांनी हजारो समर्थकांच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांचा कणखर बाणा... निवडून आणा पाना, अशा घोषणा देत समर्थकांनी सिंदखेड राजा नगरी दणाणून सोडली होती. विशेष म्हणजे अनेकांनी एक नोट एक वोट या तत्त्वानुसार निवडणुकीच्या खर्चासाठी आर्थिक मदत देण्यासाठी रांग लावली होती. 
Rt
रविकांत तुपकर यांनी आज ९ एप्रिलला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन हजारो समर्थकांच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर सिंदखेडराजा शहरातून रॅली काढण्यात आली. शहरातून निघालेली ही विराट रॅली शेतकऱ्यांच्या विजयाचे संकेत देणारी ठरली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत रविकांत तुपकरांनी सांगितले की ही लढाई सर्वसामान्य जनतेची लढाई आहे.आज सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वाद आणि पाठिंब्यानेच लोकसभेच्या रिंगणात उभा आहे. जात, धर्म, पक्षावर ही निवडणूक नाही तर यावेळी आपले प्रश्न, आपल्या समस्यांवर ही निवडणूक होणार आहे. सोयाबीन कापूस व इतर शेतमालाला भाव मिळवायचा असेल, पिकविमा, नुकसान भरपाई मिळवायची असेल, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवायचा असेल, अतिक्रमणधारकांचे प्रश्न असतील, आदिवासींचे प्रश्न असतील अशा सर्वसामान्य घटकांतील सर्वांच्या समस्या सोडवण्याची ही लढाई आहे. आज सर्वांच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फोडला असून ४ जून रोजी विजयाचा गुलाल घ्यायलाही येथेच येईल, अशी ग्वाही देखील रविकांत तुपकरांनी दिली. गेल्या १५ वर्षात सिंदखेडराजा, लोणार, शेगाव, संत चोखामेळा या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांसह जिल्हाचा देखील विकास खुंटला आहे.  
Rt
  विद्यमान खासदारांनी गेल्या १५ वर्षात जिल्ह्यात विकास नव्हे तर जिल्हा भकास करण्याचे काम केले आहे, असा आरोप यावेळी त्यांनी केला. विद्यमान खासदार म्हणजे दुर्मिळ काका आहे, ते कधी मधी दिसून येतात म्हणून दुर्मिळ आहेत. गेल्या २२ वर्षात मी जे काम केलं त्या कामाची मजुरी म्हणून एक मत मागत आहे. २२ वर्षात मी फक्त शेतकऱ्यांसाठीच लढलो असे नाही तर शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, आशा व अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, अतिक्रमणधारक, आदिवासी, बारा बलुतेदार अशा सर्वच घटकांसाठी मी काम करत आलो आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने हा लढा आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा झाला आहे. विरोधक प्रचंड धनशक्तीचा वापर करतील, दादागिरी करतील पण त्यांची दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना पैशाचे आमीश दाखवणे व धमक्यांचे फोन करणे बंद करा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील यावे रविकांत तुपकरांनी दिला. माझ्या विरोधात खोटा-नाटा प्रचार करत आहेत, चुकीच्या अफवा पसरवत आहेत परंतु ही गद्दारांची फौज आता मला रोखु शकत नाही. देवस्थानांची, मंदिरांची जागा हडप करणारे, समृद्धीतून कोट्यवधीची माया कमवणारे, कमिशन बाज आता सर्वसामान्यांचा आवाज दाबू शकत नाही. आपल्या हाती आता सर्वच नट बोल्ट खोलणारा आणि कसणारा पाना आला आहे. पंधरा वर्षे जुनी झालेली खटारा बंद पाडा, संसदेत नवा चेहरा पाठवा, तुमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी मी संसदेत प्राणप्रणाने लढेल असा विश्वास यावेळी रविकांत तुपकर यांनी उपस्थितांना दिला. 
 
यावेळी दामूअण्णा इंगोले, ज्ञानेश्वर पाटील, गीते, कायंदे, नगरसेवक कैलास म्हेत्रे यांच्यासह इतरांनी आपल्या भावना व्यक्त करत स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन, आपल्या स्वतःचा पैशांची पदर मोड करून प्रचार करण्याचा निर्धार केला. शेतकऱ्यांचा खणखर बाणा...निवडून आणा पाना असा नारा देत, नव्या संसदेत नवा चेहरा पाठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
 हिम्मत असेल तर अपक्ष लढून दाखवा
Rt
  रविकांत तुपकर यांची माझ्यासमोर लढण्याची लायकी नाही, असे विद्यमान खासदार म्हणत आहेत. त्यांची जर माझ्याशी फाईट नाही तर मग ते वारंवार माझंच नाव का घेतात? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. आज गाव खेड्यातील व शहरातील सर्वसामान्य नागरिक माझ्या पाठीशी तन -मन - धने उभा आहे. लोक स्वतःहून पैसे देत आहेत, समोर येत आहेत. माझ्या वाट्याला सर्वसामान्यांचे जे प्रेम आले ते तुमच्या वाट्याला कधीच येऊ शकत नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर पक्ष सोडा आणि माझ्याप्रमाणेच अपक्ष म्हणून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा असा इशारा रविकांत तुपकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना दिला.