बुलडाण्याचे मतदान एप्रिल मध्यावर? 'लोकसभे'च्या मुहूर्ताची व्यापक उत्सुकता!
Feb 8, 2024, 08:26 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची दिल्ली ते गल्ली अशी हवा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा रणसंग्राम च्या मुहूर्ताचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. २०१९ च्या लढतीत बुलडाण्यात १८ एप्रिलला रणसंग्राम रंगला होता. यंदाच्या लढतीचा मुहूर्त कोणता हा २० लाखांवर मतदारांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. दिवसाच्या 'चाय पे चर्चा ' चा हाच विषय असून रात्री च्या थंड चाय च्या टेबलवर देखील हाच विषय रंगतोय...
मध्यंतरी आयोगाने तयारीच्या दृष्टीने १६ एप्रिल ही तत्त्वतः तारीख कळविली होती. त्यामुळे याच तारखेच्या आसपास निवडणुकांचे मुहूर्त राहतील असा व्यापक अंदाज आहे. मार्च मध्यावर निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रपुरते सांगायचे झाल्यास मागील (२०१९ची) निवडणूक चार टप्प्यात झाली होती. ११ एप्रिलला विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ- वाशीम मतदारसंघात मतदान झाले होते.१८ एप्रिलच्या दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर मध्ये मतदान घेण्यात आले. तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिलला पार पडले होते. त्या टप्प्यात जळगाव, रावेर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकनंगले मध्ये मतदान झाले.२९ एप्रिलला नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी मध्ये मतदान घेण्यात आले होते.
२०१९ चा कार्यक्रम असा होता...
बुलडाण्यापुरते सांगायचे झाल्यास २०१९ मध्ये १९ मार्च २०१९ रोजी अधिसूचना जारी झाली होती. २६ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती.२७ ला अर्जांची छाननी झाली तर २९ ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. १८ एप्रिलला मतदान झाले .२३ मे रोजी निकाल जाहीर झाले. युतीचे प्रतापराव जाधव यांनी खासदारकीची हॅट ट्रिक करून अनेक दशकापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली होती.