नवनियुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणतात... कोरोना रुग्णांचे आकडे मोठे; पण डोन्ट वरी! म्हणाले, स्वास्थ्य रथ आदिवासींसाठी ठरणार वरदायी!

 
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असले तरी जिल्हावासीयांनी एकदमच घाबरून जायचे काम नाही. याचे कारण सध्याचा कोरोनाची तीव्रता कमी असून मृत्यू दरही कमी आहे. तसेच रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी आणि लवकर बरे व्हायचे प्रमाण जास्त आहे ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. यामुळे मोठ्या आकड्यांनी भयभीत होण्याऐवजी त्रिसूत्रीचे पालन करीत दक्षता घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नुकतेच पदाची सूत्रे स्वीकारलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिराम मखराम राठोड यांनी केले.

जिल्हावासीयांना कोरोना प्रसारात वास्तववादी माहिती आणि भयमुक्त करण्याचा वसा घेतलेल्या बुलडाणा लाइव्हसोबत बोलताना त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती देत जिल्हा वासीयांना एकाचवेळी आश्वस्त आणि सावधदेखील केले. मागील वर्षीच्या तुलनेत सध्याचा कोरोना कमी उपद्रवी असून त्याची तीव्रता कमी आहे. व्यावहारिक आणि सर्वांना समजेल अशा भाषेत सांगायचे म्हणजे मागील कोरोना म्हणजे कोब्रा नाग तर सध्याचा कोरोना ग्रामीण भागात सापडून येणाऱ्या फेफऱ्या साप (बिन विषारी) सारखा आहे.

तसेच आकड्यांच्या तुलनेत दाखल रुग्ण आणि मृत्यू दर खूपच कमी आहे. डेथ रेट 0.72 टक्के तर रिकव्हरी रेट 95.78 टक्के असल्याने याला पुष्टी मिळते. जिल्ह्यात आजवर ओमिक्रॉनसदृश्य ४२ रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर स्वतंत्र आयसोलेशन वाॅर्डात उपचार करण्यात आले व येत असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. या सर्वांची परदेशी वारीची हिस्ट्री नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फिरते आरोग्य केंद्रच...
दरम्यान जिल्ह्यातील आदिवासीबहुल जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यासाठी स्वास्थ रथ ही योजना राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती डीएचओ डॉ. राठोड यांनी या चर्चेत दिली. हा आरोग्य रथ म्हणजे जणू काही फिरते प्राथमिक आरोग्य केंद्रच राहणार आहे. यात ऑपरेशन वगळता इतर सर्व उपचार सुविधा उपलब्ध राहणार आहे. रथ तालुक्यातील सर्व गावात पोहोचणार आहे.  यासाठी चेन्‍नई व मुंबई येथील संस्थांच्या 2 निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये काही त्रुटी, आक्षेप असल्याने त्या दूर करण्याचे निर्देश संबंधित संस्थांना देण्यात आले आहे. हे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यावर संस्थेची निवड जिल्हा स्तरीय निवड समिती करणार असल्याचे डॉ. राठोड यांनी स्पष्ट केले.