मरणाच्या दारातून हजारोंना बाहेर आणणारा देवदूत!
डॉ. लद्धड यांचे मूळ गाव मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रमजवळील ब्रह्मपुरी. त्यांचे वडील सैन्यात हवालदार होते. ब्रह्मपुरीच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वडील सैन्यातून रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना बुलडाणा येथील पोस्ट ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे ते बुलडाण्यात स्थायिक झाले. बुलडाण्याच्या श्री शिवाजी विद्यालयात डॉ. दीपक लद्धड यांचे शिक्षण झाले. वडिलांची ५०० रुपये पगाराची नोकरी आणि आईचे शिवणकाम यावरच परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र आर्थिक चणचण कितीही असली तरी मुलांच्या शिक्षणावर परिणाम वडिलांनी कधीच होऊ दिला नाही.
भाड्याच्या खोलीत हॉस्पिटल उघडले...
शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. लद्धड यांनी १९९५ मध्ये एका भाड्याच्या खोलीत हॉस्पिटल सुरू केले. यासाठी ॲड. शंतनू काळकर आणि ॲड. ज्योतिराव राऊत यांची मोलाची मदत झाली, असे डॉक्टर सांगतात. केवळ २५ हजार रुपये जवळ असताना हॉस्पिटल सुरू झाले आणि शिक्षणासाठी सुद्धा केवळ २५ हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. १९९५-९६ च्या सुमारास बुलडाण्यात केवळ ५ ते ६ हॉस्पिटल्स होती. शहरात पुरेशी ओळख नसताना व आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असतानासुद्धा बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष भाईजी चांडक यांनी खूप मोठी मदत केली, असे डॉ. लद्धड आवर्जुन सांगतात. सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा खर्चात अत्याधुनिक पद्धतीने इथे उपचार केले जातात. नागपूरनंतर विदर्भातील पहिली कार्डियाक कॅथलॅब - अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीची सुविधा लद्धड हॉस्पिटल येथे २०१० साली सुरू झाली. बुलडाणा जिल्ह्यात पहिली अँजिओग्राफी शस्रक्रियासुद्धा डॉ. लद्धड यांनीच केली. आजघडीला हृदयविकार, अर्धांगवायू, किडनीचे आजार, सर्पदंश- विषबाधा, अस्थिरोग, कॅन्सर सर्जरी, गुडघेप्रत्यारोपण, स्त्रीरोग उपचार, वंध्यत्व उपचार असे जवळपास सर्वच उपचार डॉ. लद्धड हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत. पुढील दोन वर्षांत अवयव प्रत्यारोपण म्हणजेच किडनी ट्रान्सप्लांट आणि लिव्हर ट्रान्सप्लांटची उपचार सुविधा सुद्धा सुरू करण्याचा मानस असल्याचे डॉ. लद्धड यांनी सांगितले. सैन्यात हवालदार असलेल्या वडिलांचा मुलगा आज हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळपास १०० तर शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ४०० जणांना रोजगार देण्याचे काम करतो. यामागे माझ्या आईवडिलांचेच सर्वात मोठे योगदान व प्रेरणा आहे, असे डॉ. लद्धड सांगतात.
...हा प्रसंग कधीही विसरता येणार नाही!
१२ वर्षांच्या एका मुलाला अतिजहाल विषारी मण्यार साप चावल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. मुलाचे केवळ हृदय चालू होते. हात- पाय हलत नव्हते. डोळे बंद आणि श्वासही. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र सात -आठ दिवस होऊनही तब्येतीत काहीच फरक न पडल्याने नातेवाईक संतप्त झाले.मेलेल्या मुलावर उपचार करून तुम्ही फक्त पैसे उकळण्याचे काम करत आहेत, असा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी डॉ. लद्धड यांच्यावर केला.मात्र मुलाच्या तब्येतीत सुधारणा होईल, असा विश्वास डॉक्टरांना होता.तुमचा पेशंट बरा झाला तरच पैसे द्या नाहीतर देऊ नका, अशी समजूत डॉक्टरांनी नातेवाईकांची काढली. १५ व्या दिवशी मुलाच्या डोळ्याच्या पापणीने हालचाल केली. १६ व्या दिवशी बोटांची हालचाल झाली. २० व्या दिवशी थोडा थोडा श्वास सुरू झाला. २८ व्या दिवशी व्हेंटिलेटर काढण्यात आले आणि ३१ व्या दिवशी पेशंट पूर्णपणे बरा होऊन त्याला सुटी मिळाली. त्यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी माफी मागितली. स्वतःच्या कामावर, कार्यपद्धतीवर आणि देवावर विश्वास असला की सर्व ही चांगले होते, असे डॉ. लद्धड सांगतात.
कोविड काळात साडेसतरा हजार रुग्णांवर उपचार
वैद्यकीय व्यवसायात त्यांच्या पत्नी डॉ. संगीता लद्धड हॉस्पिटलचे प्रशासन पूर्णपणे सांभाळतात. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी पुरेसा वेळ मिळतो. कोविड काळात साडेसतरा हजार कोविड रुग्णांवर लद्धड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यातील १३०० रुग्णांना ॲडमिट करून तर उर्वरित रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून उपचार देण्यात आले. आजही डॉ. दीपक लद्धड दिवसातील १८ तास काम करतात. देशात हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे. लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असा विश्वासही डॉ. लद्धड यांनी व्यक्त केला.
१० वीत असतानाच ध्येयनिश्चिती...
आयुष्यात आपल्याला काय करायचे आणि कशासाठी करायचे याचे ध्येय निश्चित असलेच पाहिजे, असा आग्रह डॉक्टरांच्या वडिलांचा नेहमीच होता. त्यामुळे १० वीत असतानाच आपल्याला पुढे डॉक्टर होऊन प्रामाणिक वैद्यकीय व्यवसाय करायचा हा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले. चांगला अभ्यास केल्याने त्यांचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला नंबर लागला आणि ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे डॉ. लद्धड यांनी सांगितले.
.असा झाला प्रेमविवाह...
एमबीबीएसला असतानाच बॅचमेंट असलेल्या डॉ. संगीता यांच्याशी डॉ. दीपक यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सर्व काही व्यवस्थित असल्याने दोन्हीकडच्या कुटुंबियांनी आनंदाने त्यांच्या नात्यांचा स्वीकार केला आणि दोन्ही परिवाराच्या मदतीने हा प्रेमविवाह संपन्न झाला. तेव्हा डॉक्टरांचे वय होते २३ वर्षे. नंतरच्या काळात डॉ. लद्धड यांनी नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधून एम.डी.मेडिसिन ही पदवी मिळवली.