पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं झालंय स्वस्त!; बुलडाण्यात आहे 'हा' दर!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. बुलडाण्यात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८,६०० रुपये आहे, तर चांदी ६७ हजार रुपये किलो आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीत सुधारणा होत असतानाही सोने-चांदीच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. मुंबईत १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,४१० रुपये असून, चांदी ६२,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती शहराशहरात बदलत असतात.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,४१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,९५० रुपये आहे. नागपूरमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,४१० रुपये इतका आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२५ रुपये आहे, तर बुलडाण्यात ६७० रुपये आहे. उल्लेखनीय म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरात कोणताही फरक नसून, हॉलमार्क सोन्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाहीये. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा आहे.
अशी ओळखा सोन्याची शुद्धता...
२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध असते. पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नसते. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यात ९१.६६ टक्के सोने असते. तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळलेले आहेत. शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क असून, ते दागिन्यांवर असतात.