१५ वर्षीय मुलीच्या आत्महत्येला प्रेमसंबंधांची किनार; प्रियकर फरार, देऊळगाव घुबे येथील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव घुबे (ता. चिखली) येथील १५ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली होती. ही आत्महत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे आता समोर आले आहे. आरोपी प्रियकर हा घटना घडल्याच्या दिवसापासून फरारी आहे.
अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलांचा ८ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले असून आईनेही दुसरा विवाह केला आहे. त्यामुळे ती तिच्या आजीकडे राहत होती. ४ सप्टेंबर रोजी दुपारी घरी कुणी नसताना गावालगत असणाऱ्या विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली होती. तिच्या आजीने याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारीनुसार मुलीचे गावातीलच आकाश संजय पुरभे (१८) याच्यासोबत प्रेमसंबंध होते.
ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आकाशला समजावून सांगितले होते. त्यानंतरही तो तिला फोन करत होता. ४ सप्टेंबर रोजी दुपारी आकाशने तिला फोन केला. त्यावेळी दोघांत वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरातच मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या आजीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आकाशविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ पंजाबराव साखरे करीत आहेत.