१० दिवसांपूर्वी लग्न झालेली १९ वर्षांची तरुणी; त्याच गावातून १७ वर्षीय मुलगाही बेपत्ता; भादोला येथील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १० दिवसांपूर्वीच लग्न झालेली १९ वर्षीय नवविवाहिता गायब झाल्याची घटना भादोला येथे ३० ऑगस्ट रोजी रात्री घडली. याच गावातून, याच दिवशी १७ वर्षे १० महिन्यांचा मुलगाही बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी काल, १ सप्टेंबर रोजी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी नवविवाहिता बेपत्ता झाल्याची तर मुलाच्या अपहरणाची नोंद केली आहे.
मूळचे भादोला येथील असणारे व नागपुरात मजुरी काम करणारे नवविवाहितेचे वडील सुनील भीमराव गवई यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. चार महिन्यांपूर्वी सुनील गवई हे मुलीच्या लग्नासाठी भादोला येथे आले होते. त्यांची मुलगी सौ. आरती हिचा विवाह २० ऑगस्ट रोजी केसापूर येथील सुमेध खिल्लारे याच्यासोबत झाला होता. ३० ऑगस्ट रोजी मुलगी माहेरी आली होती. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आरतीने तिच्या आईला टिकल्या आणण्यासाठी १० रुपये मागितले. दुकानात जाऊन येते असे म्हणत ती घराबाहेर पडली.
मात्र रात्री उशिरापर्यंत परतलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने काल, १ सप्टेंबर रोजी वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार दिली. दुसऱ्या घटनेत सुमीनाबी शेख हमीद शेख (४०, रा. भादोला) यांनी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यांचा मुलगा शेख अस्लम हा ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता गावातून येतो असे म्हणाला व घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. ३१ ऑगस्ट रोजी त्याचा दिवसभर शोध घेऊनही तो न सापडल्याने काल बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.