सावत्र पित्याचा १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार!; बाळाला दिला जन्म!!; रेल्वेने अकोल्याला जाताना नांदुऱ्याजवळ पोटात दुखू लागले, खामगावपर्यंत जन्माला आला मुलगा!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरी कुणी नसल्याची संधी साधून सावत्र पित्यानेच १७ वर्षीय मुलीवर तीन वेळेस लैंगिक अत्याचार केला. यातून ती साडेसात महिन्यांची गर्भवती राहिली. पुण्याहून अकोल्याकडे रेल्वेने जाताना नांदुऱ्याजवळ मुलीच्या पोटात दुखू लागले. वेदना वाढत गेल्याने मुलीसह सावत्र पिता व तिची आई नांदुऱ्यात उतरले. तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून मुलीला खामगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र रस्त्यातच ऑटोत मुलीची प्रसुती होऊन तिने बाळाला जन्म दिला. सध्या बाळ-बाळंतिण सुखरुप आहेत. खामगाव शहर पोलिसांनी नराधम सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटना पुणे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा तिकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.
४० वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ही महिला पुण्याच्या विश्रांतवाडी भागातील गणेशनगरात किरायाने राहते. तिने दुसरे लग्न केले असून, पहिल्या पतीपासून तिला १७ वर्षीय मुलगी आहे. घरी कुणी नसल्याची संधी साधून ३८ वर्षीय सावत्र पित्याने १ जानेवारी २०२१ ते ९ सप्टेंबर २०२१ दरम्यान मुलीवर तीनदा लैंगिक अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिची पुण्याच्याच जीवन हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केली. त्यात ती साडेसात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. आईने मुलीला खोदून विचारणा केली असता तिने सावत्र पित्यानेच दोन-तीनदा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. तिने पतीला जाब विचारला असता त्यानेही शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगून चूक झाल्याची कबुली दिली.
मात्र त्याचवेळी पोलिसांत न जाता तिची आई पतीच्या सांगण्यावरून पीडित मुलीला घेऊन अकोल्याला त्याच्या नातेवाइकाकडे रेल्वेने निघाली. मात्र मध्येच त्यांचे बिंग फुटले. नांदुऱ्याजवळ मुलीला प्रसुती कळा सुरू झाल्या. नांदुऱ्यात उतरून हे तिघेही प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला खामगावच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यास सांगितले. ऑटोने खामगावला येत असताना मध्येच ती प्रसूत झाली. तिने मुलाला जन्म दिला. सामान्य रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांनी खामगाव शहर पोलिसांना कळवले. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नराधम पित्याविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटना पुण्यात घडलेली असल्याने शहर पोलीस हे प्रकरण पुण्याच्या पोलिसांकडे वर्ग करणार आहेत. तपास सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे करत आहेत.