सावकाराच्या जाचाला कंटाळून सलून व्यावसायिक तरुणाची आत्महत्या; खिशात सापडली चिठ्ठी, जळगाव जामोद येथील घटना
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सावकाराच्या जाचाला कंटाळून सलून व्यावसायिक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, २६ ऑगस्ट रोजी दुपारी जळगाव जामोद शहरात घडली. मृतक तरुणाच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तरुणाच्या पत्नीने रात्री जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश लेंडस्कर (२५, रा. जळगाव जामोद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेशचे शहरातच सलूनचे दुकान आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार गणेशने मलकापूर येथील सोपान तायडे व खामगाव येथील विठ्ठल दळी यांच्याकडून सलून व्यवसायासाठी व्याजाने कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने दोघेही गणेशला वारंवार रात्री बेरात्री फोन करून पैशाचा तगादा लावत होते. त्यामुळे गणेश नेहमी चिंतेत राहत होता. काल दोघांच्या छळाला कंटाळूनच गणेशने राहत्या घरात गळफास घेतला. पत्नीच्या तक्रारीवरून सोपान तायडे व विठ्ठल दळी यांच्याविरोधात जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.