साखर कारखाना शाळेत प्राथमिक शिक्षण; प्रतिकूल परिस्थिती अन्‌ यूपीएससीमध्ये कौतुकास्पद यश! दुसरबीडशी नाळ जुळलेला अमोल मुरकुट देशात 402 वा

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वडिलांची खासगी नोकरी अन् तुटपुंजा पगार, त्यांच्यावर असलेली पाच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, साखर कारखाना परिसरातील शाळेत झालेले शिक्षण… अशा एक ना अनेक अडचणींवर मात करून त्याने उच्च शिक्षण घेतले; पण त्यावरच समाधान न मानता “आकाशी झेप घेई पाखरा’ या गीताच्या पंक्तीप्रमाणे अक्षरशः गरुडझेप घेत थेट यूपीएससीला गवसणी …
 
साखर कारखाना शाळेत प्राथमिक शिक्षण; प्रतिकूल परिस्थिती अन्‌ यूपीएससीमध्ये कौतुकास्पद यश! दुसरबीडशी नाळ जुळलेला अमोल मुरकुट देशात 402 वा

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वडिलांची खासगी नोकरी अन्‌ तुटपुंजा पगार, त्यांच्यावर असलेली पाच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, साखर कारखाना परिसरातील शाळेत झालेले शिक्षण… अशा एक ना अनेक अडचणींवर मात करून त्याने उच्च शिक्षण घेतले; पण त्यावरच समाधान न मानता “आकाशी झेप घेई पाखरा’ या गीताच्या पंक्तीप्रमाणे अक्षरशः गरुडझेप घेत थेट यूपीएससीला गवसणी घातली! देशपातळीवर 402 रँकसह हा पल्ला गाठतानाच त्याने मातृतीर्थ परिसरातील दुसरबीड आणि बुलडाणा जिल्ह्याचा नावलौकिक आकाशापर्यंत नेऊन भिडवला! ही यशोगाथा आहे डॉ. अमोल सुरेश मुरकूट या खडतर आव्हाने पेलून यशाची नवनवीन शिखरे गाठणाऱ्या प्रतिभासंपन्‍न युवकाची! त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवलाच; पण परिस्थितीचे रडगाणे गात मागे फिरणाऱ्या रणछोडदास वृत्तीच्या युवकांना एक सणसणीत चपराकदेखील लगावली आहे.

25 सप्टेंबर 2021 रोजी लोकसेवा संघ आयोगाने घोषित केलेल्या निकालामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील रहिवासी डॉ. अमोल मुरकुट यांचे नाव झळकले. यापूर्वी विशाल नरवाडे यांनी जिल्ह्याला हा बहुमान मिळवून दिला होता. त्याची पुनरावृत्ती करत अमोल मुरकूट यांनी मातृतीर्थ जिल्ह्याचा लौकिक वाढविला. डॉ. अमोल यांचे वडील मूळ मेहकर येथील रहिवासी. कामानिमित्त ते जिजामाता सहकारी कारखाना दुसरबीड येथे आले. जेमतेम कमाईमध्ये पाच मुलांचे शिक्षण केले. दोन मुलांना नवोदय विद्यालय शेगाव येथे शिकवले. डॉ. अमोल यांनी प्राथमिक शिक्षण जिजामाता सहकारी कारखाना शाळेत पूर्ण केले. 12 वीपर्यंत जवाहर नवोदय विद्यालय तर एमबीबीएसचे शिक्षण जे. जे. हॉस्पिटल मुंबई येथे केले. पुढील एक वर्ष दिली येथे व नंतर पुणे येथे यूपीएससीची तयारी केली. बुद्धिमत्ता, परिश्रम, जिद्द आणि खडतर परिश्रम या चतुःसूत्रीच्या पाठबळावर त्याने युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनवर मात केली असून, आता जिल्हाधिकारी हे पद त्याच्यापासून काही महिने दूर आहे.