वाकूड सशस्त्र हाणामारीतील मुख्य संशयित भरत लाहुडकार पोलिसांना शरण!; “राष्ट्रवादी’ने तालुकाध्यक्षपदही काढले!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाकूड (ता. खामगाव) येथे ८ एप्रिलला झालेल्या सशस्त्र हाणामारी प्रकरणातील मुख्य संशयित आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष भरत विश्वासराव लाहुडकार अखेर काल, २९ ऑगस्टला पोलिसांना शरण आला आहे. यापूर्वीच पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली होती. मात्र भरत लाहुडकार पोलिसांना गुंगारा देत होता. हल्ल्यातील जखमींच्या नातेवाइकांनी बुलडाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर २८ ऑगस्टला उपोषण केले. “बुलडाणा लाइव्ह’ने हे प्रकरण उचलून धरले. त्यामुळे दबावाखाली आलेल्या लाहुडकारने आत्मसमर्पण केले. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याने पक्षाची बदनामी होत असल्याने पक्षातूनही त्याच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आला. त्यातून त्याने २६ ऑगस्टला पदाचा राजीनामा दिला. राजीनामा २८ ऑगस्टला मंजूर करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या उच्चस्तरीय सूत्रांनी “बुलडाणा लाइव्ह’ला सांगितले.
भरत लाहुडकार, वसंता लाहुडकार, सुधाकर लाहुडकार, मंगेश लाहुडकार, तेजराव अढाव अशी या प्रकरणात अटक झालेल्यांची नावे आहेत. यापूर्वीही भरत लाहूडकारविरुद्ध गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. तरीही पोलीस त्याला अटक का करत नाहीत, असा सवाल करत हल्ल्यातील जखमींचे नातेवाइक नितीन गजानन लाहूडकार आणि संजय हरिभाऊ लाहूडकार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आरोपीला कायद्याची भीती राहिली नाही. आमच्या कुटुंबावर जीवघेणा सशस्त्र होऊन साडेचार महिने झाले आहेत, तरीही आरोपीला अद्याप अटक नाही. हल्ल्यातील गंभीर जखमी गजानन लाहूडकार दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलीस जोपर्यंत भरत लाहूडकारला शोधून अटक करत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला होता.
काय आहे घटना…
८ एप्रिलला वाकूड (ता. खामगाव) येथे भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी मोजणीसाठी उपस्थित होते. त्यावेळी सरकारी रस्त्याला सिमेंट पोल व तारकंपाउंड करून रस्ता अडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत लाहुडकर याने माजी सरपंच सोपान लाहुडकर यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला होता. यात तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. हल्ल्यात सोपान लाहुडकर यांच्या परिवारातील सहा जण गंभीर जखमी झाले होते. यातील तिघांना अकोला तर तिघांना खामगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. जखमींपैकी ५ जण बरे झाले आहेत; परंतु गजानन वासुदेव लाहुडकर (४९) यांना तलवारीचे गंभीर घाव बसल्याने ते घटनेच्या दिवसापासून कोमात आहेत. अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, मृत्यूशी झुंज देत आहेत.