लाचखोर स्‍टेनो ३ हजार रुपये घेताना जाळ्यात!; मेहकर उपविभागीय कार्यालयात “एसीबी’ची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लघुलेखकाला (स्टेनो) ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मेहकर येथील उपविभागीय कार्यालयात बुलडाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली. मिलिंदकुमार सुदाम वाठोरे (५६) असे या लाचखोर स्टेनोचे नाव आहे. तो बुलडाणा शहरातील मच्छी ले आउट भागातील …
 
लाचखोर स्‍टेनो ३ हजार रुपये घेताना जाळ्यात!; मेहकर उपविभागीय कार्यालयात “एसीबी’ची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लघुलेखकाला (स्टेनो) ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्‍या सुमारास मेहकर येथील उपविभागीय कार्यालयात बुलडाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली. मिलिंदकुमार सुदाम वाठोरे (५६) असे या लाचखोर स्टेनोचे नाव आहे. तो बुलडाणा शहरातील मच्छी ले आउट भागातील रहिवासी आहे.

वेणी (ता. मेहकर) येथील एका महिलेला गाव शिवारातील अर्धा एकर शेती विकायची होती. त्यासाठी परवानगीसाठी तिने उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्याच्या पारित आदेशाची प्रत देण्यासाठी लाचखोर वाठोरे याने ७ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र महिलेला लाच द्यायची नसल्याने तिने बुलडाणा एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने आज मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचला होता. पडताळणीवेळी वाठोरे याने तडजोडीअंती ३ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता त्याने ३ हजार रुपये स्वीकारले व एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर झडप घातली.

वृत्त लिहीपर्यंत त्याच्याविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पो.ना. विलास साखरे, मोहम्मद रिजवान, पोकाँ विनोद लोखंडे, जगदीश पवार, चालक नापोकाँ नितीन शेटे यांनी पार पाडली.
कुणी लाच मागत असल्यास…
कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : ०७२६२-२४२५४८
टोल फ्री क्रमांक ः १०६४