रात्री १० ला परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज; विद्यार्थी संतप्त, काही परीक्षा केंद्रावर पोहोचलेही; चिखली बसस्थानकावर विद्यार्थ्यांचा राडा; श्वेताताई म्हणाल्या, आघाडीचा महागोंधळ!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज, २५ सप्टेंबरला होऊ घातलेली आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. काल, २४ सप्टेंबरला रात्री दहाला परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज मिळाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. जिल्ह्यातून अमरावती, अकोला, नागपूर येथे परीक्षा देण्यासाठी काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर रात्रीच पोहोचले होते. तिथे पोहोचल्यानंतर तर काहींना वाटेत असताना परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज मिळाला.
जिल्ह्यातून चिखली, खामगाव आगाराने परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अकोला आणि अमरावतीकडे जाणाऱ्या जादा गाड्या सोडण्याचा निर्णयही घेतला होता. गाड्या रात्रीच निघणार असल्याचे खेड्यापातील अनेक विद्यार्थी बसस्थानकावर जमले होते. जालन्यावरून अमरावतीला जाणारे ५० विद्यार्थी रात्री चिखली बसस्थानकावर पोहोचले. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने त्यांचा मनस्ताप झाला. तालुक्यातील १०० ते १५० विद्यार्थी चिखली बसस्थानकावर पोहोचले होते. विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. दूरवरून आलेल्या काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बॅगा आपटल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
मंत्र्यांचे फोन बंद…
बसस्थानकावर जमा झालेल्या विद्यार्थ्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय, बच्चू कडू, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे या सर्वांना फोन केले. मात्र सर्वच मंत्र्यांचे फोन स्वीच ऑफ येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
आम्ही नागपुरात पोहोचलो, प्रवास खर्च द्या…
चिखली तालुक्यातील शुभम इंगळे, गणेश ठेंग या विद्यार्थ्यांचा आज नागपूरला पेपर होता. एसटी बसने ते काल रात्री ८ लाच नागपूरसाठी निघाले. प्रवासात फोन बंद पडल्याने त्यांना परीक्षा रद्द झाल्याचे आज सकाळी नागपुरात पोहोचल्यावर कळाले. त्यामुळे ते संतप्त झाले आहेत. आमचा प्रवास खर्च आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आघाडी सरकारच्या महागोंधळाचा हा उच्चांक आहे. बरेच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. देव न करो कुण्या विद्यार्थ्याने चुकीच पाऊल उचलू नये. मात्र दुर्दैवाने तसे झाले तर याची जबाबदारी मुख्यमंत्री घेणार की आरोग्यमंत्री?
-श्वेताताई महाले, आमदार, चिखली