भूमिका : थेट मदतीसाठी लोकप्रतिनिधींनी आक्रमक होण्याची गरज!; दिखाव्यापुरत्या मागण्या नकोत!!; शेतकऱ्यांचा टाहो
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २७ व २८ सप्टेंबरला अतिवृष्टीने जिल्ह्यातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी सारीच पिके वाया गेली आहेत. कर्ज काढून पेरणी केल्याने शेतकऱ्यापुढे मोठे संकट उभे राहिले असून, सरकारकडे हा शेतकरी मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. या स्थितीत नेहमीप्रमाणे लोकप्रतिनिधी सरकारकडे लेखी, तोंडी मागणी करून शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे दाखवत असले तरी, त्यांच्या नुसत्या मागणीने काय होणार हे शेतकऱ्यांनाही माहीत आहे. पंचनामे आणि मदतीची घोषणा यापेक्षा सरकारकडून तातडीने थेट मदत कशी मिळेल यासाठी लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे.
गुलाब चक्रीवादळाने जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. पिके पाण्याखाली गेली. नदीकाठावरील शेते खरडली गेली असून, पिकेच नाही तर मातीही नदीत वाहून गेली आहे. अशा स्थितीत मदतीचे निकष न लावता सरसकट मदत देण्याची आवश्यकता शेतकरी व्यक्त करत आहेत. पंचनाम्यांच्या सोपस्कारात बराच वेळ निघून जातो. अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तर पंचनामाही होत नसल्याचे प्रकार मागील काळात समोर आले आहेत. पीक विमा कंपनीकडे तक्रार करूनही कंपनीचे प्रतिनिधी शेताकडे आले नसल्याची ओरड शेतकऱ्यांची आहेत. त्यामुळे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेल याची शाश्वती कमीच आहे. विमा कंपनीच्या कारभाराबद्दल लोकप्रतिनिधीही ज्ञात आहेत. लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांत शेतकऱ्यांचाच ९० टक्के भरणा असतो. किमान आपल्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी तरी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. केवळ निवेदनांचा सिलसिला न सुरू करता सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्याची स्थिती मांडणे आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या पदरात पाडणे आवश्यक आहे.