भाविक पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण प्रार्थनास्थळाचे निर्जंतुकीकरण! वेळापत्रक व्यवस्थापन ठरविणार; पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांची राहणार करडी नजर!! ७ ऑक्‍टोबरपासून गजबजणार धार्मिक स्थळे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांचे आदेश जारी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश आज, 1 ऑक्टोबरला निर्गमित केले. यात स्थानिक स्थिती लक्षात घेता अनेक बाबी स्पष्ट करण्यात आल्या असून, भाविकांच्या प्रवेशाचे वेळापत्रक ट्रस्ट, बोर्ड, व्यवस्थापन समितीने ठरवायचे आहे. एखादा भाविक कोरोनाबाधित आढळला तर तात्काळ …
 
भाविक पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण प्रार्थनास्थळाचे निर्जंतुकीकरण! वेळापत्रक व्यवस्थापन ठरविणार; पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांची राहणार करडी नजर!! ७ ऑक्‍टोबरपासून गजबजणार धार्मिक स्थळे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांचे आदेश जारी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश आज, 1 ऑक्‍टोबरला निर्गमित केले. यात स्थानिक स्थिती लक्षात घेता अनेक बाबी स्पष्ट करण्यात आल्‍या असून, भाविकांच्या प्रवेशाचे वेळापत्रक ट्रस्ट, बोर्ड, व्यवस्थापन समितीने ठरवायचे आहे.

एखादा भाविक कोरोनाबाधित आढळला तर तात्काळ संपूर्ण स्थळाचे निर्जंतुकीकरण करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. व्यवस्थापन सर्व निर्बंधांचे पालन करतात किंवा नाही यावर पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करडी नजर ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी या आदेशात दिले आहे. या सहा पानी तपशीलवार आदेशात भाविक, ट्रस्ट, शासकीय यंत्रणा यांनी पाळावयाचे निर्बंध, नियम, कामाची जबाबदारी आदी नमूद करण्यात आले आहे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना येणारे भाविक, जागा, सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे.

दृष्टीक्षेपात निर्देश…

  • गरोदर स्त्रिया, 65 वर्षांवरील आणि 10 वर्षांखालील बालकांना प्रवेशाला मनाई.
  • धार्मिक स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास मनाई.
  • प्रार्थनेसाठी एकच चटई, जमखाना वापरण्यास मनाई, प्रत्येकाने स्वतःची चटई आणून ती परत न्यावी.
  • आतमध्ये प्रसाद वितरण व पवित्र जल शिंपडण्यास मनाई.
  • मूर्ती, पुतळे, पवित्र पुस्तके यास स्पर्श करू नये.
  • प्रवेश व बाहेर जाण्याकरिता स्वतंत्र रांग, रांगेत भाविकांमध्ये 6 फूट अंतर राखावे.
  • भाविक, सेवेकरी, कर्मचारी यांनी वापरलेल्या मास्क, रुमाल, हात मोजे यांची योग्य विल्हेवाट लावावी.
  • कर्मचारी व सेवेकरी यांनी कामावर येण्यापूर्वी व आठवड्यातून एकदा कोविड चाचणी करावी.
  • निर्धारित वेळेत किती भाविकांना प्रवेश देणार याचा निर्णय ट्रस्टने स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून घ्यावा.