बोलेरो पिकअपने उडवल्याने मोटारसायकलस्वार ठार; कोलारा फाट्यावरील घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बोलेरो पिकअप वाहनाने उडवल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल, ३० ऑगस्टच्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मेहकर- चिखली रोडवरील कोलारा फाट्यावर घडली.
सचिन रामदास दानवे (३५, रा. गांधीनगर, चिखली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. त्याचे सख्खे चुलत भाऊ भारत देविदास दानवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन दानवे हा मित्र नीलेश शिंगणे यांच्यासोबत साखरखेर्डा येथे कामानिमित्त मोटारसायकलने (MH 28 BM 5755) गेला होता.
सायंकाळी साडेपाचला कुणीतरी फोन करून सचिनचा कोलारा फाट्याजवळ अपघात झाल्याचे भारत दानवे यांना सांगितले. त्यामुळे ते मनोज बेडवाल, राजू चुनावाले, नितीन खुनारे व इतर नातेवाइकांसह खासगी गाडीने तातडीने अपघात स्थळी गेले. त्या ठिकाणी सचिन गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. मोटरसायकल क्षतीग्रस्त झालेली होती. तातडीने सचिनला खासगी वाहनातून चिखली ग्रामीण रुग्णालय आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.