…म्हणून तो चढला होता BSNL टॉवरवर!; तब्बल सहा तासांनी उतरला खाली!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बीएसएनएल टॉवरवर चढलेला ५५ वर्षीय व्यक्ती तब्बल सव्वा सहा तासांनी उरतला. तोपर्यंत त्याने कुणालाही दाद दिली नाही. पावसातही तो टॉवरवरच ठाण मांडून होता. त्या उतरवल्यानंतर चढण्याचे कारण पोलिसांनी विचारले असता, पोलिसांनीही डोक्यावर हात मारून घेतला. कौटुंबिक वादातून त्याने ही उठाठेव केली होती. मात्र यामुळे पोलीस प्रशासनाची कित्येक तास तारांबळ उडाली. काल, ९ ऑगस्टच्या दुपारी साडेतीनपासून तो टॉवरवर होता, थेट रात्री पावणेदहालाच उतरला.
जोरदार पाऊस आणि टॉवरची उंची यामुळे त्याची सुरुवातीला ओळखही पटत नव्हती. त्यामुळे प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्याचा फोटो टिपला. सोशल मीडियाद्वारे ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर तो बुलडाण्यातील मिलिंदनगर भागातील संजय लक्ष्मण जाधव (५५) असल्याचे समोर आले. त्याला उतरवण्यासाठी पोलीस लाऊडस्पीकरद्वारे आवाहन करत होते.
तुझ्या काय मागण्या आहेत ते सांग, असे वारंवार सांगूनही तो ऐकत नव्हता. अंधार पडल्यामुळे टॉवरवर नेमके काय चालले हेही समजत नव्हते. त्यामुळे पोलीसही भर पावसात तिथे ठाण मांडून होते. अखेर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तो रात्री पावणेदहाला उतरला. कौटुंबिक वादामुळे कंटाळून तो टॉवरवर चढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नंतर त्याला घरी नेऊन घातले. दारू पिण्याच्या सवयीमुळे मुले, बायको त्याला बोलत असल्याने दारू पिऊन तो रागाच्या भरात टॉवरवर चढला असल्याची चर्चा आहे.