बुलडाणा लाइव्ह आपत्ती निवारण कक्षात; मदत कार्यासाठी झटणाऱ्या यंत्रणेचा आँखो देखा हाल..!; बातमी नक्कीच वाचा, कळेल तुम्हाला यंत्रणा जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी कशी झटत असते…!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गुलाबी चक्रीवादळाने जिल्ह्यात कालपासून थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, नदी नाल्यांना आलेला पूर आणि त्यामुळे होणारे नुकसान यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाने कालच जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा दिला होता. रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने जिल्हा आपत्ती निवारण कक्षातील फोन क्षणाक्षणाला खणखणत होता. आलेल्या फोनवरून त्या त्या भागात सुरू असलेल्या पावसाबद्दल माहिती दिली जात होती. कोणत्याही क्षणी बचावकार्यासाठी जावे लागू शकते म्हणून आपत्ती निवारण यंत्रणेचे शोध व बचाव पथक, साहित्य आणि वाहनासह सज्ज असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील पूरपरिस्थिती बघता निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते आज सकाळी ६ वाजेपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या कार्यालयात पोहोचले होते. मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वीजपुरवठा अडीच तास खंडित झाला होता. याही परिस्थितीत श्री. गीते जिल्ह्यातील तलाठी, तहसीलदार यांच्याशी संपर्क ठेवून होते. कुठे वीज पडली, कुठे आणि कोणत्या मंडळात अतिवृष्टी झाली, कोणते रस्ते वाहून गेले याची माहिती ते फोनवरून घेत होते. स्थानिक अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत होते. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती राज्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात होते.
आपत्ती निवारण कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष २४ तास सुरू आहे. आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण घेतलेले पोलीस आणि महसूल विभागाचे असे एकूण ४० कर्मचारी कोणत्याही क्षणी बचावासाठी निघण्यास सज्ज असल्याची माहिती आपत्ती निवारण कक्ष प्रमुख संभाजी पवार यांनी दिली. बचाव कार्यासाठी जिल्हा यंत्रणेकडे २ बोटी, लाईफ जॅकेट, दोन ओबीएम मशीन, वायर रोप असे साहित्य आहे. एनडीआरएफच्या जवानांनी जिल्ह्याच्या शोध व बचाव पथकाला प्रशिक्षण दिले आहे.
जीव वाचवण्यासाठी आपत्ती निवारण पथकाचे कार्य
नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा जीव वाचवण्याला आपत्ती निवारण कक्षाकडून प्राधान्य दिले जाते. मात्र शोध व बचाव पथकाला कधी कधी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. खोल पाण्यात मृतदेह गेला असेल तर तो ३० तासांत पाण्यावर आपोआप बाहेर येतो. मात्र कधीकधी मृतदेह लवकर न सापडल्याने जीवाची बाजी लावून शोध व बचावकार्य करणाऱ्या जवानांवर नागरिक आणि मृतकाचे नातेवाइक रोष व्यक्त करतात. २०१८ मध्ये खामगाव तालुक्यातील हिंगणा -उमरा येथे पुराच्या पाण्यात १ तरुण मन नदीत वाहून गेला होता. त्याला शोधण्यासाठी जिल्हा बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते.मात्र पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाह, आभाळातून कोसळणारा मुसळधार पाऊस अशा परिस्थिती जवान शोधकार्य राबवत होते. मात्र मृतदेह सापडत नव्हता.अंधार पडत असल्याने नागरिक बचाव पथकावर रोष व्यक्त करीत होते. बचाव पथकाचे वाहन फोडण्याचा काहींनी प्रयत्न केला, तर मृतदेह सापडेपर्यंत बचाव पथकाला बाहेर येऊ द्यायचेच नाही, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली होती. एका मृतदेहाचा शोध घेण्यासाठी २० जवानांनी त्यांचा जीव धोक्यात घालावा, अशी चुकीची भूमिका तेव्हा स्थानिक नागरिकांनी घेतली होती.
४० मिनिटांत पथक गावात पोहोचले; तिथे गेल्यावर कळले काहीच प्रॉब्लेम नाही…
९ सप्टेंबर २०२१ संध्याकाळी पावणेपाच वाजता आपत्ती निवारण कक्षाला माहिती मिळते, “मोताळा तालुक्यातील काळेगावला पुराणे वेढा दिला आहे. एका महिलेला प्रसुतीकळा येत असून दवाखान्यात जाण्यासाठी पुराचे पाणी ओलांडून जाणे शक्य नाही. अवघ्या ५ मिनिटांत शोध व बचाव पथकाचे जवान काळेगावसाठी रवाना झाले. ४० मिनिटांत जवान बोट घेऊन पोहोचले. मात्र गावात गेल्यानंतर कोणत्याही महिलेला प्रसुतीकळा येत नसल्याचे समजले. गावातील पुढाऱ्यांनी तहसील कार्यालयाला चुकीची माहिती दिल्याचे समोर आले. ज्या महिलेचे नाव सांगून बचाव पथकाला बोलावण्यात आले त्या महिलेच्या प्रसुतीसाठी महिनाभराचा वेळ असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे आपल्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती त्या महिलेला सुद्धा नव्हती. चुकीच्या माहितीमुळे मात्र बचाव पथकाला मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्हावासीयांच्या मदतीसाठी २४ तास तत्पर
जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख संभाजी पवार, सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार संजय बंगाळे, पोलीस विभागप्रमुख पो.हे.काँ. तारासिंग पवार, बोटचालक कृष्णा जाधव, राजेंद्र झाडगे, प्रवीण साखरे, रविकांत बंगाळे, महसूल वाहन चालक प्रदीप खरे, पो.ना. गजानन जाधव, पो.ना. संतोष काकड, पो.काँ. रवींद्र गीते, पो.काँ. गुलाबसिंग राजपूत, पो.हे.काँ. विजयसिंग महाले आपत्ती निवारणासाठी २४ तास सज्ज आहेत. आपत्ती निवारण कक्ष संपर्क : ०७२६२-२४२६८३ टोल फ्री : १०७७