बुलडाणा नगरपालिकेच्या कामात कोट्यवधीचा गैरव्यवहार!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या चार वर्षांत नगरपालिकेने केलेल्या विकासकामांत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला असून, या कामांचे उच्चस्तरीय लेखा परिक्षण करावे, अशी मागणी शहर काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विभागीय आयुक्तांनाही निवेदन पाठविण्यात आले.
शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण या विभागांतून झालेल्या कामांत मोठ्या गैरव्यवहाराची शक्यता निवेदनात वर्तविण्यात आली असून, भूखंड, इमारती कंत्राटदार, राजकीय व्यक्ती, संस्थांच्या घशात घालण्याचे काम नगरपरिषदेने केल्याचे म्हटले आहे. नियमानुसार नगर परिषदेचे भूखंड, जागा, इमारती, दुकाने, शाळा तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी देता येत नाहीत. मात्र नाममात्र ठराव घेऊन त्या देण्यात आल्याने यात मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.