प्रेम, लग्न अन् विरोध करणाऱ्या सासऱ्यावर “असा’ काढला वचपा!; बुलडाणा शहरातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रेमसंबंधातून पळून जाऊन लग्न केले. मात्र अवघ्या एक महिन्यात तिला आपले खरे रंग दाखवले. दारू पिऊन तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ती पुन्हा वडिलांच्या घरी निघून आली. वडिलांनी आपलं लेकरू चुकलं म्हणून तिला घरात घेतले. पण याचा राग त्याला आला. त्याने सासऱ्यावर वचपा काढण्यासाठी मोटारसायकलने जोरात येऊन त्यांच्या मोटारसायकलला कट मारला. यात सासरे पडून जखमी झाले असून, त्यांच्या मोटारसायकलचेही नुकसान झाले. सासऱ्यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून या बिघडलेल्या जावयाविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध काल, १२ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला आहे.
गजानन संपत डोंगरदिवे (३८, रा. गायरान सागवन बुलडाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. विकी किसन इंगळे (रा. गायरान सागवन) असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. डोंगरदिवे यांची १८ वर्षीय मुलगी वृषालीने विकीसोबत मार्च २०२१ मध्ये लग्न केले. लग्नानंतर ती १ महिना त्याच्या घरी राहिली. मात्र तो दारू पिऊन मुलीला त्रास देत असल्याने ती माहेरी आली. तेव्हापासून ती माहेरीच राहते. विकी काही कामधंदा करत नाही. मर्जीविरुद्ध हे लग्न झालेले असल्याने सासरचेही त्याला मान देत नाहीत. त्यामुळे तो सासरे व त्यांच्या मुलांचा राग करतो.
काल सकाळी सव्वा नऊला डोंगरदिवे हे मोटारसायकलने कामावर जात असताना शाहू इंजिनीअरिंग काॅलेजसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या विकी किसन इंगळे याने त्याच्या ताब्यातील होंडा शाइन मोटारसायकल भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या मोटारसायकलला कट मारला व पळून गेला. यामुळे डोंगरदिवे यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटून ते पडले. यात त्यांना मार लागला आहे. मोटारसायकलचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या तक्रारीवरून पोलिसांनी विकीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास बिट पोहेकाँ कोकीळा तोमर करत आहेत.