पतीच्या बेदम मारहाणीमुळे विवाहितेचा गर्भपात!, साडेपाच महिन्यांची होती गर्भवती, नांदुरा पोलिसांत तक्रार दाखल
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीने केलेल्या बेदम मारहाणीत साडेपाच महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहितेचा गर्भपात झाला. विवाहितेने नांदुरा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध काल, ९ ऑगस्टला गुन्हा दाखल केला आहे. दीपक मधुकर तायडे (३०) असे या पतीचे नाव आहे.
प्रियांका दीपक तायडे (२४, रा. पनवेलकर ग्रीन सिटी, मियामी बिल्डिंग, रुम नं. ३०४, मोरीवतीपाडा, अंबरनाथ जि. ठाणे, ह. मु. कृष्णानगर, बुलडाणा रोड, नांदुरा) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचे लग्न ३१ मे २०१९ रोजी नांदुरा येथे दीपकसोबत झाला. तो भारतीय नौदलात (कुलाबा मुंबई) कार्यरत आहे. मूळचा वडजी (ता. मलकापूर) येथील असून, सध्या पनवेलकर ग्रीन सिटी, अंबरनाथ जि. ठाणे येथे हे दाम्पत्य राहत होते. विवाहितेची सासू-सासरे वडजी (ता. नांदुरा) येथे राहतात. दीर किरण तायडे, सोनम तायडे असे खासगी नोकरीकामी औरंगाबाद येथे राहतात. पती दारू पिण्याचे सवयीचे असून, मूल होत नाही या कारणावरून विवाहितेचा मारहाण करायचे, असे तक्रारीत म्हटले आहे. पतीपासून ४ फेब्रुवारी २०२१ पासून तिला दिवस राहिल्याने ती अंबरनाथ येथील आयुरीय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. सासू त्यांच्या घरी अंबरनाथला राहण्यासाठी १७ जून २०२१ रोजी आली होती. त्याचकाळात तिचे वडील व आईसुध्दा गर्भवती असल्याने भेटण्यासाठी येऊन गेले. २० जून २०२१ ला पतीने तू माझ्या आईची सेवा केली नाही, असे म्हणून तिच्याशी भांडण केले होते. त्यानंतर १६ जुलै २०२१ ला संध्याकाळी पती दीपक दारू पिऊन घरी आला. पुन्हा तू माझी आई आल्यानंतर तिची सेवा केली नाही. तू तिच्याशी व्यवस्थित बोलली नाही, असे तिला मारहाण करून केस पकडून भिंतीवर आदळले.
यावेळी तिला पाच महिने १५ दिवसांची गर्भधारणा झालेली होती. ती कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून बाहेर आली व शेजारी राहणाऱ्या अरुणा वैंगिरी यांचा दरवाजा वाजवला. त्यांनी तिला दरवाजा उघडून घरात घेतले. त्यावेळी तिच्या पतीने अरुणा यांचा दरवाजा जोरजोराने वाजवून पत्नीला बाहेर काढा, असे म्हटले. पतीच्या धाकाने विवाहितेने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांना कळवल्याने पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर तिने वडिलांना बोलावून घेत त्यांच्यासोबत नांदुऱ्याला आली. २३ जुलैला सकाळी सातला पतीने मारहाण केल्याने तिला रक्तस्त्राव सुरू झाला. खामगाव येथील डॉ. महाजन यांच्याकडे उपचारासाठी गेली. मात्र तरीही रक्तस्त्राव न थांबल्याने २७ जुलै २०२१ ला पुन्हा डॉ. महाजनांकडे गेली असता त्यांनी पोटातील गर्भ खराब झाल्याचे सांगून गर्भपात केल्याशिवाय रक्त थांबणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गर्भपात करावा लागला. काल तिने नांदुरा पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी पती दीपक मधुकर तायडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.