दोन घरे फोडून १० लाखांचा मुद्देमाल लुटून नेला!; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना; चोरीसाठी खतरनाक युक्ती वापरली!!
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव येथे काल, ३ सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला. दोन घरे फोडून तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. आज, ४ सप्टेंबर रोजी या घटना समोर आल्या. सिंदखेडराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण केले होते. गावातील हनुमान मंदिराजवळ येऊन श्वान थांबले. तेथून चोरटे गाडीच्या सहाय्याने पसार झाले असावेत, असा संशय पोलिसांना आहे.
गोळेगाव- देऊळगाव राजा रोडवरील शेतात रामचंद्र देवसिंग कोल्हे (५६) यांचे घर आहे. रात्री ते भजनाच्या कार्यक्रमासाठी गावात आले होते. चोरट्यांनी ही साधून त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून रोख ८८ हजार ५०० व एक सोन्याची पोत, बोटातील अंगठी असा अंदाजे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रामचंद्र कोल्हे भजन आटोपून घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यानंतर चोरट्यांनी सुरेश आत्माराम कोल्हे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. खिडकीजवळ झोपलेल्या सुरेश कोल्हे यांच्या वडिलांच्या अंगावर गुंगीचे औषध टाकून खिडकी तोडून घरात प्रवेश केला.
घरात झोपलेल्या सर्वच सदस्यांच्या अंगावर गुंगीचे औषध टाकण्यात आले. त्यानंतर चोरटे घरातील पेटी घेऊन घरामागील शेतात गेले. पेटी फोडून पेटीतील रोख ९६ हजार रुपये, पेटीतील दागिने, दोन गंठन, पाच अंगठ्या, एक गहूमणी पोत, लहान मुलांची चैन, कानातील डुले असा एकूण ६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घरातील सदस्यांना पहाटे जाग आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. रामचंद्र कोल्हे व सुरेश कोल्हे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक श्री. घुगे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते रजेवर असल्याने तात्पुरता तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. राठोड करत आहेत.