दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या १६ वर्षीय अल्पवयीन मित्राचेही अपहरण झाल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मुलाच्या वडिलांनी दिली. याप्रकरणी काल, १० ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मंगेश देविदास कारभारी (१७, रा. जवळखेड ता. देऊळगाव राजा) व अंबादास कैलास खेत्रे (१६, रा. उंबरखेड ता. देऊळगाव राजा) अशी अपहरण करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत.
देविदास कारभारी गवई (४१, रा. जवळखेड ता. देऊळगाव राजा) यांनी तक्रार दिली, की ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते शेतातून घरी आले. हातपाय धुतल्यानंतर घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले १५ हजार रुपये काढण्यासाठी त्यांनी पेटी उघडली असता त्यात पैसे दिसले नाहीत. त्यांनी त्यांचा मुलगा मंगेशला फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता. त्यांनी मंगेशचा मित्र अंबादासला याबाबत विचारणा केली असता तोही बेपत्ता असल्याचे त्यांना समजले. त्यांनी देऊळगाव राजा बसस्टँड, जालना बस स्टँड, जालना रेल्वे स्टेशन, मित्र परिवार व नातेवाइकांकडे शोध घेतला तरी दोघेही मिळून आले नाहीत. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दोन्ही मुलांना अज्ञात कारणास्तव फूस लावून पळवून नेले, अशी तक्रार मुलाच्या वडिलांनी दिली आहे.