दुसऱ्या ‘निकाह’साठीचा खटाटोप… एकीला धमकी, दुसरीला थेट ‘ट्रिपल तलाक’!; देऊळघाटमध्ये १० जणांविरुद्ध तर पिंपळगाव काळेमध्ये ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!!
बुलडाणा/खामगाव (जिल्हा प्रतिनिधी/भागवत राऊत ः बुडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकाचा दुसऱ्या लग्नासाठीचा खटाटोप आणि दुसऱ्याने चक्क दुसरे लग्नही उरकलेले… त्यामुळे पहिलीचा ठरणारा अडसर दूर करण्यासाठी या विवाहितांचा छळ मांडण्यात आल्याच्या घटना देऊळघाट (ता. बुलडाणा) आणि पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथे समोर आल्या आहेत. देऊळघाट येथील पतीसह सासरच्या १० जणांविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी तर पिंपळगाव काळे येथील पतीसह सासरच्या ३ जणांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देऊळघाटचा पती म्हणतो, हमे तलाक दो, हम दुसरी शादी करेंगे!
रेश्मा परवीन शेख इरफान(२६, रा. देऊळघाट, ह.मु. साखरखेर्डा) या विवाहितेने काल, ५ सप्टेंबर रोजी साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, तिचे लग्न देऊळघाट येथील बांधकाम ठेकेदार शेख इरफान शेख लुकमान (३०) याच्यासोबत मे २०१८ मध्ये झाले होते. दोघांना आरजान नावाचा मुलगा आहे. रेश्माच्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे २-३ लाख रुपये खर्च करून लग्न लावून दिले होते. सासरच्यांनी केवळ सुरुवातीचे ५ -६ महिने वागविले. नंतर तुझ्या वडिलांनी लग्नात खर्च केला नाही. तुझा बाप हमाली करतो. तुझी आमच्या घरात राहायची लायकी नाही, असे म्हणत सासरची मंडळी तिला अपमानित करत होती. नवरा छोट्या छोट्या गोष्टीत चुका काढून सतत मारहाण करत होता. सासू, नणंद यांनी रेश्माच्या अंगावरील दागिने काढून घेतले. तिला वारंवार शिविगाळ व मारहाण करण्यात येत होती, असे तक्रारीत म्हटले आहे. रेश्मा गरोदरपणासाठी माहेरी गेली असता सासरच्या मंडळींनी कोणताही खर्च केला नाही. मुलाचा जन्म झाल्यानंतर मुलाच्या हृदयात छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचारासाठी औरंगाबादला पाठविण्यात आले.
मात्र तरीही सासरच्या मंडळींनी कोणताही खर्च केला नाही व मुलाला पाहण्यासाठी देखील आले नाहीत. माहेरकडील शेत विकून १ लाख रुपये आणल्याशिवाय नांदायला येऊ नको, असे सासरच्यांनी फोनद्वारे कळविले. माहेरच्यांनी कशीबशी समजूत काढत रेश्माला देऊळघाटला नेऊन सोडले. त्यानंतर पुन्हा रेश्माचा छळ सुरू झाला. १ लाख रुपये नही दे सकती तो हमे तलाक दो, हम दुसरी शादी करेंगे, असा नवरा म्हणाला. ३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी रेश्माला खोलीत पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला. मात्र आरडाओरड केल्याने शेजारचे लोक धावून आल्याने मी वाचले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर रेश्माला माहेरी आणण्यात आले. महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल करण्यात आली. तिथे समुपदेशन झाल्यानंतर सुद्धा रेश्माला नांदवण्यास सासरच्या मंडळींनी वारंवार नकार दिल्याने काल रेश्माने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी रेश्माचा पती शेख इरफान शेख लुकमान, सासरा शेख लुकमान शेख अमान, नणंद हुमा शेख लुकमान, नणंद शन्नो शेख लुकमान, सासू आबेदा शेख लुकमान, नंदई शेख लुकमान, नणंद आस्मा नुरखा पठाण, नंदई नुरखा प्यारेखा पठाण ,नंदई फेरोज खा हबीब खा पठाण व नणंद रेश्मा फेरोजखा पठाण (सर्व रा. देऊळघाट ,ता बुलडाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव काळेचा पती म्हणाला, तलाक तलाक तलाक…
पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथे ट्रिपल तलाकचे प्रकरण समोर आले आहे. शेगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख हातम शेख इमाम, मदिनाबानो शेख इमाम, शेख इमाम शेख हुसैन (सर्व रा. टीपू सुलताननगर पिंपळगाव काळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शबाना बी शेख हातम (३५, रा. लेंडी तलाव उर्दू शाळेमागे, शेगाव) या विवाहितेने त्यांच्याविरुद्ध आज, ६ सप्टेंबरला तक्रार दिली. शबानाच्या पतीने त्याचे दुसरे लग्न लपवून ठेवले होते. ही बाब कळताच तिने पतीला विचारणा केली असता त्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. लग्नात हुंडा कमी दिला. मोठ्या वस्तू दिल्या नाहीत. लग्नात पाहुण्यांची व्यवस्था केली नाही. तू दिसायला चांगली नाही या कारणावरून तिला अपमानित केले. तिला तीन तलाक दिला व तुला तलाक दिला. आता तू माझी पत्नी नाही, असे तिला सांगितले. पोलिसांत तक्रार दिली तर जीवे मारीन अशी धमकीही दिली. तपास पोलीस कर्मचारी गजानन इंदोरे करत आहेत.