दारू “न’ पिणाऱ्या चोरट्यांनी फोडले देशी दारूचे दुकान!; मलकापूर पांग्रा येथील घटना
मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड राजा) येथील देशी दारूच्या दुकानाचा टीनपत्रा कापून चोरट्यांनी गल्ल्यातील ५० हजार रुपये चोरून नेले. ही घटना १० ऑगस्टच्या रात्री घडली. काल, ११ ऑगस्टला सकाळी चोरी झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी देशी दारूची एकही बॉटल चोरून नेली नाही. त्यामुळे चोरटे दारू पित नसावेत, अशी चर्चा गंमतीने गावात होत आहे.
मलकापूर पांग्रा येथे कुरशिद बेगम खलील हुसेन सिद्दिकी यांचे देशी दारूचे दुकान असून, हे दुकान व्यंकना गोलापल्ली चालवितात. काल रात्री त्यांनी दुकानाचा आलेला गल्ला आणि जवळ असलेले काही पैसे दुकानाच्या गल्ल्यात ठेवून दुकान बंद करून रात्री घरी गेले. सकाळी जेव्हा त्यांनी दुकान उघडले तेव्हा चोरट्यांनी दुकानाचे टिनपत्रे कापून आत प्रवेश करीत गल्ल्यात असलेले ५० हजार रुपये चोरून नेल्याचे दिसून आले. ही चोरी करताना एकही देशी दारूची बाटली चोरून नेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान तेथे सीसीटीव्ही असून देखील ज्या ठिकाणी सीसीटीव्हीचे फुटेज दिसते त्याठिकाणी चोरटे आले नाहीत. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांत तक्रार देण्यात आली असून घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक दीपक राणे, बीट जमादार नारायण गीते, जमादार श्री. मुंडे ,वाहन चालक गजानन वाघ आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.