दामदुपटीच्या आमिषाने गरीब महिलेला गंडवले!; आंबेटाकळीच्या ‘PACL’ प्रतिनिधीचा प्रताप!!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सहा वर्षांनंतर गुंतवलेली रक्कम दुप्पट होईल असे आमिष दाखवून आंबेटाकळी (ता. खामगाव) येथील गरीब महिलेची एजंटनेच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने या प्रकरणी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. या महिलेने मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी ही रक्कम हप्त्याहप्त्याने जमा केली होती. मात्र सहा वर्षांनी दुप्पट तर नाहीच, पण गुंतवलेली रक्कमही मिळाली नाही. उलट पोलिसांत खोटी तक्रार करून जेलमध्ये घालू, अशी धमकी तिला देण्यात आली.
सौ. ज्योती सुरेश कचाले या महिलेने या प्रकरणात तक्रार केली असून, आंबेटाकळी येथील पीएसीएल इंडिया लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधीने तिची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रतिनिधीची पत्नी मैत्रिण असल्याने विश्वास ठेवून सौ. ज्याेती यांनी गुंतवणूक केली. सहा वर्षांनी रक्कम दुप्पट होईल असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते.
मात्र सहा वर्षे पूर्ण होऊनही दुप्पट तर नाहीच, पण भरलेले पैसेही देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात ती पैसे मागण्यासाठी विमा प्रतिनिधीच्या घरी गेली असता तिला त्याच्या पत्नीने धमकावले. त्याच्या मुलानेही शिविगाळ केली. प्रतिनिधीने खोटी तक्रार देऊन तिला जेलमध्ये घालू, अशी धमकी दिली. या प्रतिनिधीने कष्टाने जमा केलेली रक्कम विश्वासघात करून हडपली असल्याचे तक्रारीत सौ. ज्योती यांनी म्हटले आहे.