थैलीत निघाला साप; चालकाचे नियंत्रण सुटून ऑटो उलटला!; मजूर ठार, चौघे गंभीर जखमी, बुलडाणा तालुक्यातील घटना
बुबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कामावरून घरी परतताना ऑटोच्या दणक्यामुळे थैलीत असलेला साप अचानक बाहेर आला. त्यामुळे ऑटोतील सर्वच एकाएकी घाबरले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ऑटो उलटला. या अपघातात एक बांधकाम मजूर ठार तर चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुलडाणा- अजिंठा रोडवरील देऊळघाटजवळ काल, १ सप्टेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली.
प्रल्हाद रामजी हिवाळे (५४, रा. देऊळघाट, ता. बुलडाणा) असे अपघातात ठार झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. सुपडा कौतिकराव हिवाळे, गणेश शिवलाल बिबे, मनोज सुखदेव जाधव व चालक रशीद मिर्जा (सर्व रा. देऊळघाट) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुलडाणा शहरात बांधकामावर काम करणारे हे सर्व जण एका ॲपे वाहनात देऊळघाट येथे जात होते. जेवणासाठी आणलेले डब्बे ठेवलेल्या पिशवीत साप असल्याची त्यांना कल्पना नव्हती. मात्र वाहनाच्या दणक्याने हातात असलेल्या थैलीतील साप अचानक बाहेर आल्याने सर्वच जण घाबरले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व ऑटो उलटला. या अपघातात प्रल्हाद हिवाळे जागीच ठार तर चालकासह अन्य तीन मजूर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.