तुमच्या मुलाला डॉक्टर, पोलीस बनवू म्हणाली होती, पण लावले भिकेला!; धक्कादायक खुलासा, देऊळगावमहीच्या महिला एजंटच्या निर्लज्जपणाचा कळस!!
बुलडाणा/औरंगाबाद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलांना विकत घेऊन भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. आता या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असून, त्यावरून अशा प्रकारचे रॅकेट राज्यभरात सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे.
औरंगाबाद येथे दोन मायलेकी एका चिमुकल्याला मारहाण करत होत्या. त्यानंतर तेथील सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने चिमुकल्याची सुटका करण्यात आली होती. या चिमुकल्याला ५५ हजार रुपयांत विकत घेतल्याची कबुली या मायलेकींनी दिली होती. नागरिकांनी या चिमुकल्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यात त्याने तो देऊळगाव महीचा असून, भीक मागण्यासाठी मला विकत घेतल्याचे सांगितले होते. चिमुकल्याच्या आई- वडिलांना औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. जिच्या मध्यस्थीच्या माध्यमातून हा सौदा झाला होता, त्या देऊळगाव महीच्या नंदाबाई उदावंत या महिलेला पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी अटक केली होती.
पोलिसांनी त्या चिमुकल्याच्या आईवडिलांची चौकशी केली असता त्यांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले. चिमुकल्याच्या आई- वडिलांचा खुरपे, विळे, कुऱ्हाडी बनविण्याचा व्यवसाय असल्याने ते फिरस्ती असतात. देऊळगाव मही येथील नंदाबाईने चिमुकल्याच्या आई- वडिलांना शिक्षणाचे आमिष दाखवले. तुमच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था तुमच्याकडून नीट होणार नाही. मी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करते. त्याला डॉक्टर किंवा पोलीस बनवू, असे आमिष नंदाबाईने दाखवल्याचे चिमुकल्याच्या आई- वडिलांनी पोलिसांना सांगितले. मध्यंतरी आमचा मुलगा कसा आहे विचारले असता. तो चांगला आहे व औरंगाबादला होस्टेलला आहे, असे नंदाबाईने त्याच्या आई- वडिलांना सांगितले होते. याप्रकरणात पोलिसांनी औरंगाबाद तालुक्यातील तिसगाव येथून सुद्धा एका एजंटला अटक केली असून, तपास सुरू आहे.