तुझ्या बायकोला घेऊन ये तेव्हाच घरात रहा; दोन भावांमध्ये हाणामारी; बुलडाणा तालुक्यातील घटना
बुलडाणा : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोठ्या भावाची पत्नी नेहमी माहेरीच असते म्हणून लहान भावाने मोठ्यासोबत वाद घातला. वादातून दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जखमी झालेल्या मोठ्या भावाने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी लहान भावाविरोधात तक्रार दिली. खुपगाव (ता. बुलडाणा) येथील ही घटना आहे.
आशिष बबन नरवाडे यांनी काल, ३० ऑगस्टला दिलेल्या तक्रारीनुसार त्याचे आणि त्याच्या बायकोचे आपसात पटत नाही. त्यामुळे त्याची बायको नेहमी माहेरी असते. त्यामुळे तो त्याची आई व लहान भावासोबत राहतो. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी घरी गेला असता त्याचा लहान भाऊ रामने त्याच्यासोबत वाद घातला. तुझी पत्नी आणल्याशिवाय घरात राहू नको, असे म्हणत त्याने आशिषला शिविगाळ केली. कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यात मारहाण केल्याने आशिष जखमी झाला. त्याने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून राम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.