…तर जिल्ह्यातील सर्वच कंत्राटी आरोग्य सेविकांचे कामबंद!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्यात १३० कंत्राटी आरोग्य सेविका काम करत आहेत. यापैकी २४ कंत्रांटी आरोग्य सेविकांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा ६ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच कंत्राटी आरोग्य सेविका संपावर जातील. परिवारासह अन्नत्याग आंदोलन करतील असा इशारा आज, ३ सप्टेंबर रोजी कंत्राटी आरोग्य सेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
२०२१-२२ च्या आर्थिक वर्षात राज्यातील ५९७ कंत्राटी आरोग्य सेविकांची पदे राज्य सरकारने नामंजूर केली आहेत. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील २४ आरोग्य सेविकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार या आरोग्य सेविकांवर आहे. काही आरोग्य सेविका दोन ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार सांभाळतात. या आरोग्य सेविकांचे पदे नामंजूर केल्यामुळे त्यांच्या परिवारावर संकट कोसळले आहे. कोविडची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता कंत्राटी आरोग्य सेविकांना कामावरून काढण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा व त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.