टिनशेडमध्ये शिरून कोब्राने एकेक करत गिळली कोंबडीची १५ पिल्लं!; विरोध करणाऱ्या ४ कोंबड्यांना दंश, त्याही मृत्यूमुखी!, अमडापूर शिवारातील घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मंगळरूळ नवघरे (ता. चिखली) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील टिनशेडमध्ये शिरून कोब्रा सापाने कोंबडीची पिल्लं गिळायला सुरुवात केली. त्याला विरोध करणाऱ्या ४ कोंबड्यांना त्याने दंश केल्याने त्या दगावल्या. एकेक करत या सापाने १५ पिल्लं गिळली. सकाळी शेतात आलेल्या शेतकऱ्याने सापाचा प्रताप पाहून तातडीने सर्पमित्राला सूचना केली. सर्पमित्र श्याम तेलरकर यांनी तातडीने घटनास्थळी येऊन या भल्यामोठ्या १० मीटर कोब्राला बाटलीबंद केले. ही घटना आज, ६ सप्टेंबरला सकाळी अमडापूर (ता. चिखली) शिवारात घडली.
संदीप अंभोरे यांचे अमडापूर शिवारात शेत आहे. शेतात त्यांनी कोंबड्या आणि बकऱ्या पाळल्या असून, त्यासाठी टिनशेड उभारले आहे. या शेडमध्ये काल मध्यरात्री कोब्रा जातीचा साप शिरला. त्याने कोंबड्यांच्या पिलांना खायला सुरुवात केली. त्यामुळे कोंबड्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. पण हा नाग त्यांना पुरून उरला. त्याने श केल्याने चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. त्यानंतर सापाने १५ पिल्लं गिळली. सकाळी अंभोरे कोंबड्या व बकऱ्या सोडण्यासाठी गेले असता भलामोठा साप पाहून त्यांचाही थरकाप उडाला. त्यांनी तातडीने सर्पमित्र तेलरकर यांना कळवले. तेलरकर यांनी घटनास्थळी येऊन सापाला मोठ्या हुशारीने बाटलीबंद केले. या सापाचे वय जवळपास २० वर्षे असल्याचे त्यांनी सांगितले. हा साप माणसाला चावला तर १५ मिनिटांत मृत्यू होतो, असेही त्यांनी सांगितले.