जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना दिलासा; पीक नुकसानीची पाहणी
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मेहकर तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी खासदार प्रताप जाधव, आमदार संजय रायमूलकर यांचीही उपस्थिती होती.
अतिवृष्टीने नदीकाठच्या आणि अन्य भागांतील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. ब्रह्मपुरी, दुधा, कंबरखेड, गौंढाळा, कल्याणा, अंत्री देशमुख भागात ही पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत, तातडीने नुकसानीचा अहवाल सरकारकडे सादर करत मदतीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी दिली. दौऱ्यात जिल्हा परिषद कृषी सभापती राजेंद्र पळसकर, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, तहसीलदार डॉ. संजय गरकल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, जिल्हा परिषद सदस्य आशिष राहाटे, संजय वडतकर आदींचा सहभाग होता.
खासदारांनी मदतीसाठी धरावा आग्रह
राज्यातील शिवसेनेचे सरकार असल्याने खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा आणि तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या लोकप्रतिनिधींनी मदतीसाठी निवेदने देण्याचे सत्र आरंभले आहे. निवेदनांनी आजवर कितपत मदत मिळाली हे शेतकरी जाणून घेत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेऊन सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.