जळगाव जामोदमध्ये शिवसेना नगरसेवकाची दादागिरी; रस्ता बांधकाम करणाऱ्यांना म्हणाला, कमिशन न देता काम कसे काय करता?
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद शहरातील प्रभाग क्रमांक ४ चे शिवसेना नगरसेवक रमेश मारोती ताडे यांनी रस्ता बांधकामावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या मजुराला मारहाण केली. ही घटना काल, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास प्रभाग क्र. ४ मधील राम मंदिराजवळ घडली. सुपरवायझरने दिलेल्या तक्रारीवरून नगरसेवक रमेश मारोती ताडे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार कंत्राटदार अमोल राजपूत यांनी प्रभाग क्र. ४ मधील रस्त्याचे काम घेतले आहे. राजपूत यांनी या कामावर सुपरवायझर म्हणून पंकज उत्तमराव देशमुख (४०, रा. जळगाव जामोद) यांना नियुक्त केले आहे. रमेश मारोती ताडे हे प्रभाग क्र. ४ चे नगरसेवक आहेत. या प्रभागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी सुपरवायझर पंकज देशमुख कामाच्या ठिकाणी गेले. तेव्हा तिथे नगरसेवक रमेश ताडे आले. “मी या प्रभागाचा नगरसेवक आहे. तुम्ही माझ्या प्रभागात कसे काय आलात. माझी परवानगी व कमिशन न देता तुम्ही काम कसे काय सुरू करता’ असे म्हणत नगरसेवकाने सुपरवायझरला मारहाण केली. बाजूला पडलेला फरशीचा तुकडा त्यांच्या डोक्यात घातला. यावेळी नगरसेवकासोबत आलेला नगरसेवकाचा मुलगा प्रणव व रामेश्वर वंडाळे यांनीसुद्धा तक्रारदाराला मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून नगरसेवक रमेश मारोती ताडे, नगरसेवकपूत्र प्रणव रमेश ताडे, रामकृष्ण वंडाळे (सर्व रा. जळगाव जामोद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.