खासगी कर्जाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; चिखली तालुक्यातील घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खासगी कर्जाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, १७ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास पिंपळवाडी (ता. चिखली) येथे घडली.
एकनाथ शिवराम बनकर (३२, रा. पिंपळवाडी, ता. चिखली) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. एकनाथ बनकर यांच्याकडे पिंपळवाडी शिवारात अडीच एकर शेती होती. त्यांच्यावर खासगी सावकाराचे कर्ज होते. आज दुपारी ते चिखलीवरून घरी आले तेव्हा पत्नी व मुले शेतात गेलेली होती. त्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व लाकडी बल्लीला गळफास घेतला. ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात येताच माहिती अंढेरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. बनकर यांच्या पश्चात आई, वडील, २ लहान भाऊ, पत्नी, १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे.