खडखड वाजत होतं, शेतकऱ्याने जाऊन पाहिले अन् समोरील दृश्य पाहून हादरलाच!; मेहकर तालुक्यातील घटना
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोठ्यात खडखड वाजत असल्याने शेतकऱ्याने जाऊन पाहिले असता गावातील एक बहाद्दर चक्क त्याचे दोन बैल चोरून नेण्याच्या बेतात होता. शेतकऱ्याला पाहून त्याने बैल सोडून पळ काढला. ही घटना आज, ४ ऑक्टोबरला पहाटे चारच्या सुमारास शेतकऱ्याने डोणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून संशयित चोरटा गणपत सुरेश डाखोरे (रा. जनुना, ता. मेहकर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमोल उध्दव सरदार (३६, रा. जनुना ता. मेहकर) या शेतकऱ्याने या प्रकरणात तक्रार दिली. त्यांच्या घरासमोर उघड्या गोठ्यात खडखड आवाज आल्याने त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले. तेव्हा गणपत सुरेश डाखोरे हा दोन बैल (किंमत ६० हजार रुपये) चोरून नेताना दिसला. सरदार यांनी त्याला गोठ्यात कशाला आला, असे विचारले असता तो बैलांच्या दोऱ्या सोडून गोठ्यातून पळून गेला. तपास पोहेकाँ दिलीप राठोड करत आहेत.