कुटुंबाला जीवंत पेटवून देण्यासाठी घरच दिले पेटवून; संग्रामपूर तालुक्यातील थरार
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराला आग लावून अख्ख्या कुटुंबाला जीवंत पेटवून देण्याचा प्रयत्न टुनकी बुद्रूक (ता. संग्रामपूर) येथे काल, ३ ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आला. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी ४५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कस्तुराबाई साहेबराव मंडासे (६०, रा. टुनकी, ता. संग्रामपूर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. अंबादास कैलाश झाल्टे (४५, रा. टुनकी) असे आरोपीचे नाव आहे. कस्तुराबाई, त्यांची मुलगी, नातवंडे घरी असताना अंबादास दारू पिऊन आला. कस्तुराबाईंना त्याने मोबाइल मागितला. काही वेळ तो फोनवर बोलला. त्यानंतर कस्तुराबाईंनी मोबाइल परत मागितला असता त्याने कस्तुराबाई आणि त्यांच्या मुलीला शिविगाळ केली व मोबाइल जमिनीवर आदळून फोडून टाकला.
मोबाइल का फोडला, असे विचारले असता त्याने त्यांना व त्यांच्या मुलीला लाथाबुक्क्यानी मारहाण केली व जिवाने मारून टाकेल, अशी धमकी दिली. केवळ धमकीवरच न थांबता त्याने आता तुम्हाला घरातच पेटवून टाकतो, असे म्हणून त्याने घर पेटवायला सुरुवात केली. यात घरातील कपडे, बॅग, सुटकेस, तीन खाटी, पाण्याच्या दोन टाक्या तसेच महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर जीवनोपयोगी वस्तू जळाल्या आहेत. सुदैवाने कस्तुराबाई, त्यांची मुलगी, नातवंडे घरातून बाहेर पडल्याने वाचल्या. सोनाळा पोलिसांत कस्तुराबाईंच्या तक्रारीवरून अंबादासविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरिक्षक दीपक सोळंके करत आहेत.